माओवादी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या एका फोटो स्टुडिओच्या मालकाला छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्य़ातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील जुन्या बसस्टॅण्डजवळ कुलवर्धन प्रसाद (२९) याचा मोईत फोटो स्टुडिओ आहे. सरकारविरोधी संदेश पोहोचविणारे पत्रक काढण्यासाठी बंडखोरांना मदत करणे आणि माओवादी विचारसरणीचा प्रसार करणे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. फोटो स्टुडिओतून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून तेवढा पुरावा पुरेसा आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. लॅपटॉपमधील मजकूर प्रसिद्ध करण्यासाठीचे आवश्यक साहित्य हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी गट) आणि नक्षलवाद्यांच्या चेतना नाटय़ मंडळ या संस्थांशी संबंधित आहे.