कॅनडाचे भारताशी असलेले राजकीय संबंध अलिकडच्या काळात खूप ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रस्थान जस्टीन ट्रुडो यांच्या जागतिक राजकारणातील भूमिकांमुळे उभय देशांमधील संबंध बिघडले आहेत. यामुळे ट्रुडो यांच्या वर भारतातून टीका होत आहे. अशातच, ट्रुडो यांना त्यांच्याच देशातील लोकांच्या आणि विरोधी पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. कॅनडामधील विरोधी पक्ष कन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पोइलिवरे यांनी ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. पोइलिवरे म्हणाले, ट्रुडोंची आता पहिल्यासारखी किंमत राहिली नाही. भारतात त्यांचं हसं होतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या बाजूला पियरे पोइलिवरे यांची कॅनडात लोकप्रियता वाढू लागली आहे. लोक त्यांच्याकडे पुढचे पंतप्रधान म्हणून पाहू लागले आहेत. कॅनडात २०२५ साली सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने कॅनडात घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमध्ये (ओपिनियन पोल) त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. दरम्यान, आमचा पक्ष सत्तेवर आल्यास आम्ही भारताबरोबरचे व्यावसायिक संबंध पूर्ववत करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

नमस्ते रेडियो टोरंटो या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पोइलिवरे म्हणाले, भारताशी असलेल्या कॅनडाच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. आठ वर्षांनंतर ट्रुडो हे आता पंतप्रधानपदी बसण्यालायक राहिले नाहीत. त्यांनी आपल्याच देशात राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांना एकमेकांविरोधात उभं केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्र राष्ट्रांशी असलेले संबंध खराब केले आहेत. ते इतके अकार्यक्षम आणि अव्यावसायिक आहेत की, आपण भातासह जगातल्या शक्तीशाली देशांबरोबरच्या वादात अडकलो आहोत.

हे ही वाचा >> भारत- कॅनडा संबंध ताणलेलेच; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन, द्विपक्षीय वाटचाल कठीण टप्प्यात

पियरे पोइलिवरे म्हणाले, भारत सरकारशी आपले व्यावसायिक संबंध असायला हवेत. भारत ही जगाततली सर्वात मोठी लोकशाही आहे. एकमेकांशी असहमत असणे आणि एखाद्या गोष्टीसाठी एकमेकांना जबाबदार धरणे हे आपल्यासाठी ठीक आहे. परंतु, आपले व्यावसायिक संबंध कायम असणे आवश्यक आहे. मी पंतप्रधान झालो तर उभय देशांमधील परस्पर संबंध सुरळीत करेन.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pierre poilievre slams justin trudeau over destroying business relations with india asc