पाकिस्तानच्या सीमेवरून आलेले एक संशयित कबुतर बीएसएफ जवानांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. या कबुतराच्या पायाला मोदींना धमकी देणारी चिठ्ठी बांधण्यात आली होती. सीमेवर संशयित कबुतर घिरट्या घालत असल्याचे लक्षात आल्यावर बीएसएफच्या जवानांनी या कबुतराला ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या कबुतराच्या पायाला उर्दू भाषेत धमकी देणारी चिठ्ठी बांधण्यात आली होती. ‘मोदीजी तुम्ही आम्हाला १९७१ च्या युद्धाप्रमाणे कमकुवत समजू नका. आता पाकिस्तानमधला प्रत्येक मुलगा हा भारताविरोधात लढण्यासाठी तयार आहे’ असे या चिठ्ठीत लिहले आहे. बामियाल सेक्टरमधल्या सिंबल चौकीवर करड्या रंगाचे  संशयित  कबुतर घिरट्या घालत असल्याचे बीएसएफ जवानांच्या नजरेस पडले त्यानंतर त्याला पकडण्यात आले. रविवारी या कबुतराला जवानांनी ताब्यात घेतले. शनिवारी देखील दोन फुग्यांतून असेच धमकी देणारे पत्र याच भागात जवानांच्या हाती लागले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबध विकोपाला गेले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबरला उरी येथील लष्करी तळावर हल्ला केला होता. यात १९ जवान शहिद झाले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्याला उत्तर देश भारताने गुरूवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्टाईक करत अनेक दहशतवाद्यांना ठार केले होतो. याचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रविवारी रात्री श्रीनगरपासून ५४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ४६ राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळावर हल्ला चढवला होता यात एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाला.