रशियात मोठी विमान दुर्घटना झालीय. एल ४१० हे विमान रशियातील तातारस्तान भागात कोसळून यात १६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. याशिवाय ७ प्रवासी जखमी झालेत. या विमानात पॅराशूट जंपरचा एक गट प्रवास करत होता. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त विमानातून ७ प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय.
दुर्घटनाग्रस्त एल ४१० हे विमान दोन इंजिनचं आणि कमी अंतराचं वाहतूक विमान आहे. इंजिन खराब झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलीय.
मागील काही वर्षात रशियात विमान दुर्घटनेत वाढ
मागील काही वर्षात रशियातील हवाई वाहतुकीच्या सुरक्षेत सुधारणा झाली असली तरी रशियाच्या दुर्गम भागातील विमान दुर्घटना सामान्य आहेत. या आधी असे अनेक अपघात झाल्याचंही समोर आलंय.
हेही वाचा : फिलिपिन्समध्ये विमान दुर्घटना; २९ जणांचा मृत्यू, ५० जणांना वाचवण्यात यश
मागील महिन्यातच रशियाच्या पूर्व भागात एएन २६ या विमानाचा अपघात झाला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. जुलैमध्ये रशियातील कामचत्कामध्ये दोन इंजिनच्या एएन २६ विमानाचा अपघात झाला. त्यात विमानातील सर्वच्या सर्व २८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.