उत्तर प्रदेशमधील ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी गुरूवारी पहिल्यांदाच राज्यसभेत आले होते. यावेळी भाजप खासदार आणि विरोधकांमध्ये घोषणायुद्ध रंगले. नरेंद्र मोदी गुरूवारच्या प्रश्नोत्तराच्या तासाला हजेरी लावण्यासाठी आले तेव्हा विरोधकांनी ‘देखो देखो कौन आया है’, अशी खोचक घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भाजप खासदारांनी लगेच वेळ साधत ‘हिंदूस्थान का शेर आया है’ , अशा घोषणा देत काँग्रेसचा डाव त्यांच्यावरच उलटवला.

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पंतप्रधान मोदी १५ मिनिटांसाठी मोदी सभागृहात उपस्थित होते. प्रत्येक गुरूवारी पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित प्रश्न विचारले जात असल्याने पंतप्रधान यावेळी संसदेत उपस्थित असतात.

दरम्यान, आज राज्यसभेत भाजप खासदार रूपा गांगुली यादेखील विरोधकांवर चांगल्याच संतापल्या होत्या. रूपा गांगुली यांनी थेट सभापतींच्या आसनाजवळ जाऊन गोंधळ घातला. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी लहान मुलांच्या तस्करीचा मुद्दा उपस्थित करत गांगुली यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर संतापलेल्या रुपा गांगुली यांनी जागेवर उभे राहत अध्यक्षांकडे मला बोलण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी लावून धरली. पाटील यांनी लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी प्रत्यक्षपणे आपले नाव घेतल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी सभापतींनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही रूपा गांगुली यांनी त्यांच्या आसनाजवळ जात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अखेर मुख्तार अब्बास नक्वी यांनी रूपा गांगुली यांची समजूत काढली आणि त्यांना जागेवर परत पाठवले.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या जुही चौधरी यांनाही पोलिसांकडून लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. दार्जिलिंग नजीकच्या नेपाळ सीमेजवळ १७ लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी त्यांचे नाव पुढे आले होते. जुही यांना चंदना चक्रवर्ती नावाच्या एका महिलेने कैलाश विजयवर्गीय आणि रुपा गांगुली यांच्याशी बोलताना ऐकले होते. चंदना चक्रवर्ती नावाची ही महिला बाल संगोपन केंद्र चालवायची. जुही, कैलाश आणि रुपा यांच्या संभाषणामध्ये जुही बालसंगोपन केंद्रासाठी त्यांची मदत मागत होती. त्यामुळे याप्रकरणावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता.