Hospital Viral Video : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया रुग्णालयात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशावर एका रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

बलियामधील जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये हा प्रकार घडला आहे. यावेळी अचानक रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला. याचवेळी जनरेटरही बंद होतं. त्यामुळे रुग्णांवर चक्क मोबाईल टॉर्चच्या प्रकाशावर उपचार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा स्थानिक वीज पुरवठा आणि रुग्णालयाचा जनरेटर दोन्हीही बंद पडलं होतं. जवळपास ४५ मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव यांनी पीटीआयशी बोलाताना सांगितलं की, “जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला. तसेच वीजपुरवठा खंडित झाला होता आणि जनरेटरमध्येही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कोणीतरी ही परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.”

दरम्यान, रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉर्चवर रुग्णावर उपचार करण्यात येत असल्याचं व्हायरल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्थरातून रुग्णालय प्रशासनासह राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. त्यानंतर अखेर रुग्णालयातील सेवा सुरळीत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन वैद्यकीय कक्षात तात्काळ इन्व्हर्टर बसवलं असल्याची माहिती सांगितली जात आहे.