भारतीय जनता पक्षाचे(भाजप) वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानाबाहेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्मथकांनी निदर्शने करत, मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली. गोव्यात आज शनिवार पासून सुरू झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला लालकृष्ण अडवाणी आजारी असल्यामुळे उपस्थित राहिलेले नाहीत. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुक प्रचाराचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घोषीत होण्याची शक्यता आहे. तसेच बैठकीत मोदींचे पंतप्रधानपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून नाव घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, अडवाणींसह काही इतर भाजप नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्याने मोदींच्या नावाबाबत घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. यासर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी आज शनिवार अडवाणींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)