अहमदाबाद जवळच्या पिराणा गावातून हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणात नेमकं काय घडलं, याचा खुलासा इंडियन एक्सप्रेसने केला आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई तालुक्यातील पिराणा गावातील शेकडो रहिवासी रविवारी इमामशाह बावा संस्था ट्रस्टच्या जागेवर पूर्वी तारांचं केलेलं विभाजन बदलून भिंत बांधण्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. अस्लाली पोलिसांच्या हद्दीत हा परिसर येतो. पोलिसांनी त्यानंतर ६४ महिलांसह १३३ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पिराणा हे अहमदाबाद शहराच्या अगदी जवळ आहे. या गावात वसलेले, ट्रस्ट पीर इमामशाह बावा यांच्या दर्गा, मशीद, पीराची कबर आणि कब्रस्तानचे संरक्षक आहे. पीर इमामशहा यांचे अनुयायी सत्पंथी आहेत.

भिंतीच्या बांधकामामुळे मशीद आणि आवारातील कब्रस्तानमधून दर्गापर्यंत प्रवेश बंद होईल आणि त्याचे स्वरुप बदलेल, असं म्हणत पिराणा गावचे रहिवाशांनी विरोध केला. या गावात सैय्यद मुस्लिमांची संख्या अधिक आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने गावात सुमारे १२५ पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात केले होते. २८ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून दसक्रोईच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्याशी झालेल्या संवादानुसार, ट्रस्टच्या समितीने २५ जानेवारी रोजी ११ पैकी आठ सदस्यांच्या बहुमताने एक ठराव मंजूर करून, याठिकाणी पक्की भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. जीर्ण तारांच्या कुंपणाच्या जागी नूतनीकरणाच्या कामाचा भाग म्हणून भिंत उभारली जाणार आहे.

दसक्रोईचे एसडीएम केबी पटेल म्हणाले, “जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने तारांचे कुंपण बदलून भिंत बांधण्याचे  काम सुरू आहे. तीन विश्वस्तांनी भिंतीच्या बांधकामाला विरोध केला होता, परंतु या कामाला विश्वस्तांची बहुमताची परवानगी होती आणि एका संस्थेची परवानगी होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, ठराव मंजूर करून पुढे जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही घेण्यात आली होती. रविवारी कोणतीही अनुचित घटना घडली नाही तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली होती,” असंही त्यांनी सांगितलं.

अस्लाली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “गेल्या तीन-चार महिन्यांपासून गावात मधूनमधून दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या कामाला सैय्यदांनी विरोध करत आंदोलने केली आहेत, पण काहीही अनुचित घडले नाही. आंदोलकांनी सांगितले की ते दर्ग्याच्या जागेवर जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काही जण व्हिडिओ बनवून आणि लाइव्ह अपडेट्स देऊन उपद्रव करत होते, म्हणूनच आम्ही त्यांना ताब्यात घेतले.”

मुस्लिमांच्या सामुहिक स्थलांतराची बातमी खोटी…

दरम्यान, या गावातून सामूहिक स्थलांतर सुरू असल्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये इथले मुस्लीम हिंदूमुळे स्थलांतरित होत आहेत, असा दावा करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्विटनंतर, इंडिया टीव्हीने ग्राउंड रिपोर्ट केला. त्यात हे दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे. मुस्लिमांनी केलेल्या या आंदोलनाला स्थलांतराचं नाव देत व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. असं या रिपोर्टमधून समोर आलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest over wall on dargah premises in pirana video claims muslim mass migration know the truth hrc