ऋषिकेश बामणे
दर चार वर्षांनी रंगणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी सर्वानाच उत्सुकता असते. नियमांतील बदल, संघांच्या रंगीबेरंगी जर्सी आणि अनेक मनोरंजक गोष्टींवर चाहते नजर ठेवून असतात. आजपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या १२व्या हंगामातही अनेक नव्या नियमांची तरतूद करण्यात आली आहे, अशाच काही नियमांवर टाकलेली एक नजर-
खेळाडूंच्या गैरवर्तनावर पंचांची करडी नजर
यंदाच्या विश्वचषकात शिस्त आणि खेळभावनेचे पालन न करणाऱ्या खेळाडूंवर पंचांची करडी नजर असेल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमानुसार खेळाडूने पंचांच्या निर्णयाविरोधात अधिक नाराजी प्रकट केली अथवा मैदानावर नियम भंग केल्यास नियम क्रमांक चारच्या १.३ कलमानुसार पंच त्या खेळाडूला थेट लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवू शकतात. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकाने ‘फेक फिल्डिंग’ म्हणजेच चेंडू पकडलेला नसतानाही फलंदाजाला बाचकवण्यासाठी तो फेकण्याची कृती केल्यासही क्षेत्ररक्षकाला पंच दंड ठोठावू शकतात.
गोलंदाजांसाठी फायदेशीर ‘पॉवरप्ले’
२०१५च्या विश्वचषकात पहिल्या १० षटकांचा अनिवार्य ‘पॉवरप्ले’ झाल्यानंतर उर्वरित ४० षटकांत फलंदाजी व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कधीही पाच-पाच षटकांचे ‘पॉवरप्ले’ घेण्याची मुभा होती. मात्र २०१७पासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार पहिली १० षटके पहिला, ११ ते ४० दुसरा व ४१ ते ५० षटकांदरम्यान तिसरा ‘पॉवरप्ले’ अनिवार्य आहे. त्यानुसार अनुक्रमे दोन, चार व पाच क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची संधी गोलंदाजी करण्याला संघाला मिळते. मात्र या नियमांनंतरही फलंदाजांच्या धोरणात बदल होण्याची शक्यता कमी असून जवळपास प्रत्येक सामन्यात ५० षटकांत ३०० ते ३५० धावांचा पल्ला सहज गाठला जाण्याचीच चिन्हे अधिक आहेत.
‘लेग बाइज’ व ‘बाइज’च्या धावांची वेगळी गणना
यापूर्वी गोलंदाजाने टाकलेला ‘नो-बॉल’ फलंदाजाच्या पायाला लागून (लेग बाइज) अथवा यष्टिरक्षकाने चेंडू न पकडल्यामुळे (बाइज) फलंदाजाने धाव घेतल्यास त्या धावांचा ‘नोबॉल’च्याच धावांमध्ये समावेश व्हायचा, परंतु आता ‘लेग बाइज’ व ‘बाइज’च्या धावाही वेगळ्या मोजल्या जाणार आहेत.
दोन टप्पे चेंडू नो-बॉल
यंदाच्या विश्वचषकात काही हास्यास्पद व मनोरंजक नियमही लागू करण्यात आले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे गोलंदाजाने टाकलेला चेंडू दोन टप्पे पडून फलंदाजापर्यंत पोहचल्यास पंच त्या चेंडूला नो-बॉल घोषित करू शकतात. त्यामुळे गोलंदाजांच्या चिंतेत आता अधिक भर पडली आहे.
पायचीतसाठी दाद मागितल्यानंतरही ‘डीआरएस’ वाचवणे शक्य
यंदाच्या विश्वचषकातील सर्वात आमूलाग्र बदल म्हणजे ‘अंपायर्स कॉल’. गोलंदाजाने फलंदाजाला पायचीत केले व पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यास गोलंदाजी करणारा संघ पंचांच्या निर्णयाविरोधात ‘डीआएस’ म्हणजेच पंच निर्णय आढावा प्रणालीचा अवलंब करू शकतो. त्यानुसार चेंडूंचा यष्टय़ांना ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी भागात स्पर्श होत असेल, तर पंचांचा निर्णयच अंतिम मानला जायचा, त्याशिवाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ‘डीआएस’देखील गमवावा लागायचा. परंतु १ ऑक्टोबर, २०१७पासून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार आता पंचांनी आढावा घेतला तरी ‘डीआएस’ वाचवता येणे शक्य आहे. यामुळे दोन्ही संघांना फायदा होऊ शकतो.
हेल्मेटला लागून झेल पकडल्यास फलंदाज बाद
कोणत्याही फलंदाजाने टोलवलेला चेंडू एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास फलंदाजाला बाद दिले जाणार आहे. यापूर्वी, हेल्मेटच्या साहाय्याने झेल पकडण्यास मनाई होती, मात्र यंदा त्याही नियमात बदल करण्यात आल्यामुळे फलंदाजांना अधिक सावधपणे खेळावे लागणार आहे.