राफेलच्या समावेशामुळे हवाई युद्धाची समीकरण बदलून जाणार आहेत. चीन आणि पाकिस्तान या भारताच्या पारंपारिक शत्रुंवर एक प्रकारची जरब बसेल. पाकिस्तानकडे असलेल्या F-16 आणि JF-17 या फायटर विमानांपेक्षा राफेल कैकपटीने सरस आहे. राफेलमधील मिसाइल्स आणि रडार सिस्टिमचे पाकिस्तानकडे कुठलेही उत्तर नाहीय.
उद्या आकाशात राफेल विरुद्ध F-16, JF-17 आणि चेंगडू J-20 असा सामना झाला, तर ही लढाई कशी होईल ते आपण समजून घेऊया.
JF-17 हे चीनने विकसित केलेले फायटर विमान आहे. पाकिस्तानकडे F-16, JF-17 ही दोन अत्याधुनिक प्रकारात मोडणारी फायटर विमाने आहेत. चीनकडे चेंगडू J-20 विमान आहे. हे स्टेल्थ विमान असल्याचा चीनचा दावा आहे. JF-17आणि J-20 दोन्ही मल्टीरोल फायटर विमाने आहेत. म्हणजेच दिवस-रात्र वेगवेगळया मोहिमा पार पाडण्यासाठी ही विमाने सक्षम आहेत. JF-17 चौथ्या तर J-20 पाचव्या पिढीचे विमान आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.
डासूने बनवलेले राफेल त्याच्या टेक्नोलॉजीमुळे ४.५ जनरेशनचे फायटर विमान आहे. हे एक ‘ओमनीरोल’ फायटर विमान आहे. म्हणजे एखाद्या मोहिमेमध्ये गरजेपेक्षा जास्त अचूक कामगिरी हे विमान करुन दाखवू शकते. आठ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं. यापूर्वी टेहळणी, जमिनीवर हल्ला, हवेतून हवेत हल्ला करण्यासाठी वेगवगेळी विमान लागायची.
आणखी वाचा- …तर पाकिस्तानच्या F16 चा खात्मा होणारच, जाणून घ्या ‘राफेल’मधील ‘मिटिऑर’ची वैशिष्ट्ये
राफेल आणि JF-17 मध्ये सिंगल सीट आणि डबल सीट असे दोन्ही पर्याय आहेत. पण चेंगडू J-20 मध्ये फक्त सिंगल सीटच आहे. भारत फ्रान्सकडून २८ सिंगल सीट आणि आठ डबल सीट विमाने घेईल. प्रशिक्षणासाठी ही आठ विमाने डबल सीटमध्ये असतील.
– विनाशस्त्रास्त्र J-20 चे वजन १९ हजार किलोपेक्षा जास्त आहे. हे विमान ३७,०१३ किलोपर्यंत भार वाहू शकते.
– विनाशस्त्रास्त्र राफेलचे वजन ९९०० ते १०६०० किलो आहे. राफेलची कुठली आवृत्ती आहे, त्यावर अवलंबून आहे. २४,५०० किलो वजन वाहून नेण्याची राफेलची क्षमता आहे.
– JF-17 राफेल आणि J-20 पेक्षा खूपच हलके आहे. विनाश्सत्र JF-17 चे वजन ६,४११ किलो आहे. हे विमान १२,४७४ किलो भार वाहून नेऊ शकते.
– डासूच्या दाव्यानुसार, राफेलच्या पंखांची ज्या पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे, त्यामुळे युद्धाच्या प्रसंगात ही विमाने सरस ठरतील.
– राफेल ताशी २,१३० किलोमीटर वेगाने उड्डाण करु शकते. J-20 चा ताशी वेग २,४०० किलोमीटर आहे. JF-17 चा ताशी वेग १९७५ किलोमीटर आहे.
– चीन J-20 पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर विमान असल्याचा दावा करतो. पण त्याबद्दल शंका आहे. कारण याआधी भारताच्या सुखोई फायटर विमानांच्या रडार्सनी J-20 च्या हालचाली टिपल्या आहेत.
– तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विमान कितीही उंचीवरुन उड्डाण करु शकत असेल किंवा कितीही वेग असला तरी त्या विमानामध्ये घातक शस्त्रे, रडार नसेल तर त्या वेगाचा काही उपयोग नाही.
– मिका, मिटिओर, स्काल्प या क्षेपणास्त्रांमुळे शत्रुची विमाने राफेलच्या फार जवळ येण्याचे धाडस करणार नाहीत.
– राफेलच्या रडारमध्ये १०० किलोमीटरच्या रेंजमधील ४० टार्गेट शोधण्याची क्षमता आहे.
– आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राफेलने युद्धभूमी गाजवलीय. चीनच्या J-20 आणि JF-17 ची अजून युद्धभूमीत परिक्षाच झालेली नाही.