Sonam Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या राजा रघुवंशीचं आणि सोनमचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. दोघंही २० मे रोजी मधुचंद्राला गेले. सुरुवातीला ते बंगळुरुला गेले, त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर सोनम आणि राजा रघुवंशी शिलाँगला गेले. २३ मे रोजी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाची हत्या केली. सुरुवातीला हे जोडपं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणात हत्येचा संशय पोलिसांना आला होता. कारण राजाचा मृतदेह सापडला तरीही सोनमचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाची चक्रं फिरवली. ज्यानंतर सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला अटक झाली. या घटनेनंतर ८ जूनच्या रात्री सोनमही पोलिसांना शरण आली. आता पोलिसांना राजा रघुवंशीची हत्या ज्या हत्याराने करण्यात आली ते सापडलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांना मिळालं मर्डर वेपन

मेघालय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना आता मर्डर वेपन मिळालं आहे. राजावर पुन्हा पुन्हा वार करण्यात आले. इंदूर येथील व्यावसायिक असलेला राजा रघुवंशी याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. तो त्याच्या पत्नीसह म्हणजेच सोनमसह शिलाँगला हनिमूनसाठी आला होता. या प्रकरणात सोनम आणि इतर चार जण अशा पाच जणांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजावर पहिला हल्ला विशाल चौहानने केला होता. पोलिसांना जे मर्डर वेपन अर्थात दाऊ मिळालं आहे त्याने राजावर वारंवार वार करण्यात आले. ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती त्यांनी हे हत्यार गुवाहाटीहून विकत घेतलं होतं. राजा आणि सोनम दोन हजार पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर त्या दोघांना आरोपी विशाल आणि इतर दोघे भेटले. एक हजार पायऱ्या त्यांच्यासह चढल्यानंतर राजावर हल्ला करण्यात आला. राजावर वार झाले पण तो प्रतिकार करत होता. अखेर तिघांनी मिळून राजाची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

आरोपींची नार्को टेस्ट करा, राजाच्या कुटुंबाची मागणी

पोलिसांनी २९ वर्षीय राजा रघुवंशी याची गेल्या महिन्यात हत्या केल्या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये त्याची पत्नी सोनम तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांचा देखील समावेश आहे. आऱोपी सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. राजा रघुवंशीच्या तेराव्याच्या दिवशी त्याचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी म्हणाला की, “सोनम, तिचे पालक, भाऊ गोविंद आणि वहिनी यांची नार्को-अॅनालिसीस चाचणी करावी अशी आमची मागणी आहे.”