Rajasthan IT Scam Poonam Pradyuman Dixit : राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अधिकाऱ्याच्या पत्नीला कुठलंही काम न करता, एकही दिवस ऑफिसला न जाता दोन कंपन्यांकडून तब्बल ३७.५४ लाख रुपये इतका पगार मिळाला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या याचिकेनुसार अधिकाऱ्याची पत्नी गेल्या काही वर्षांत कुठल्याही कंपनीत, कार्यालयात गेलेली नाही, तरीदेखील तिला दोन कंपन्यांनी कथित कर्मचारी म्हणून ३७.५४ लाख रुपये इतकं वेतन दिलं आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, राजकॉम्प इन्फो सर्व्हिसेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसंचालक प्रद्युम्न दीक्षित यांना दोन कंपन्यांनी त्यांची पत्नी पूनम दीक्षित यांच्यामार्फत बेकायदेशीर पेमेंट दिल्याचं उघडकीस आलं आहे. त्यासाठी पूनम दीक्षित ओरियनप्रो सोल्यूशन्स व ट्रायझेन सॉफ्टवेअर लिमिटेड या दोन खासगी कंपन्यांमध्ये काम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या कंपन्यांना राजकॉम्प इन्फो सर्व्हिसेसच्या माध्यमातून सरकारी निविदा मिळाल्या होत्या.
नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षी ३ जुलै रोजी प्राथमिक तपास सुरू केला. निविदा मंजूर करण्याच्या बदल्यात प्रद्युम्न यांनी ओरियनप्रो सोल्यूशन्स व ट्रायझोन सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीला त्यांची पत्नी पूनम यांनी नोकरी देण्यास व मासिक वेदन देण्याचे निर्देश दिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासातून समोर आलं की ओरियनप्रो व ट्रायझोन सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० दरम्यान पूनम दीक्षित यांच्या पाच वैयक्तिक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. एकूण ३७ लाख ५४ हजार रुपये इतके पैसे पाठवण्यात आले. या काळात पूनम कधीही दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयात गेल्या नाहीत. प्रद्युम्न दीक्षित यांनी स्वतःच त्यांच्या पत्नीच्या कार्यालयीन हजेरीच्या अहवालास मंजुरी दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात उघड झालं की पूनम दिक्षित यांना एकाच वेळी दोन कंपन्यांकडून वेतन दिलं जात होतं. ओरियनप्रो सोल्यूशन्स कंपनीमध्ये बोगस कर्मचारी बनून आणि फ्रीलान्सिंगच्या नावाखाली ट्रायझोन लिमिटेड कंपनीकडून त्यांना पगार मिळत होता. या दोन्ही कंपन्यांना सरकारी कंत्राटं मिळाली होती.
