आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया सर्वांसमोर प्रपोज करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये जोस बटलरची मुलगी जॉर्जियाच्या वाढदिवसानिमित्त राजस्थानचे खेळाडू एकत्र आले होते. यात खेळाडू विविध खेळ खेळत आहेत. जेव्हा राहुल तेवतियाची वेळ आली, तेव्हा त्याने एका पाण्याच्या बाटलीला लग्नाची मागणी घातली. इतकेच नव्हे तर त्याने या बाटलीला आय लव्ह यू, असेही म्हटले. यावर इतर खेळाडू हसताना पाहायला मिळत आहेत.

 

मागील वर्षी आयपीएलमध्ये नाव कमावलेल्या राहुल तेवतियासाठी यंदाचा हंगाम चांगला गेला नाही. डावखुऱ्या तेवतियाने सात सामने खेळले आणि १७.२०च्या सरासरीने ८६ धावा केल्या. गोलंदाजी करताना तो फक्त दोन विकेट घेण्यास यशस्वी झाला.

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.