स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज यांना शनिवारी अलवार पोलिसांनी अटक केली. छत्तीसगडमधील २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असून पोलिसांनी बाबा फलाहारी यांना अटक केली. न्यायालयाने बाबा फलाहारी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राजस्थानमधील अलवार येथे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु बाबा फलाहारी यांचा आश्रम असून या आश्रमात ७ ऑगस्ट रोजी बाबा फलाहारी यांनी बलात्कार केल्याचा आरोप २१ वर्षांच्या तरुणीने केला. पीडित तरुणी ही छत्तीसगडच्या बिलासपूर येथे राहते. बिलासपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत राजस्थानमधील अलवार पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला होता. अलवार पोलिसांचे पथक बाबा फलाहारी यांना अटक करण्यासाठी आश्रमातही गेले होते. मात्र बाबा फलहारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. बाबा फलाहारी फिट असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिल्यानंतर शनिवारी दुपारी पोलिसांनी बाबा फलाहारी यांना रुग्णालयातून अटक केली. सरकारी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ६० वर्षीय बाबा फलाहारी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
ऑगस्टमध्ये पीडित तरुणी बाबा फलाहारी यांची भेट घेण्यासाठी आश्रमात गेली होती. तिचा पहिला पगार बाबा फलाहारी यांना अर्पण करण्यासाठी ती आश्रमात आली होती. ७ ऑगस्टला बाबा फलाहारी यांनी खोलीत बोलावून माझ्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता करु नये यासाठी बाबा फलाहारी यांनी धमकीदेखील दिली असे पीडितेने तक्रारीत म्हटले होते.
Rajasthan: Baba Phalahari shifted to govt hospital. A girl from Chhattisgarh's Bilaspur had lodged a sexual assault complaint against him. pic.twitter.com/D4ZQewPAJ9
— ANI (@ANI) September 23, 2017