आरूषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली. वर्ष २०१३ पासून डासना तुरूंगात ते शिक्षा भोगत आहेत. शिक्षेदरम्यान या दाम्पत्यांनी तुरूंगातील कैद्यांवर उपचार केले. या उपचारापोटी त्यांना मिळालेले ४९,५०० रूपये मानधन घेण्यास दोघांनी नकार दिला असल्याची माहिती तुरूंगाधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, या दाम्पत्याची आज (सोमवार) दुपारी तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. तलवार दाम्पत्यांकडून उपचार करून घेण्यासाठी तुरूंगात कैद्यांनी गर्दी केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आपली मुलगी आरूषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तलवार दाम्पत्यांना शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्याचा निकाल दि. १२ ऑक्टोबर रोजी निकाल लागला व न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. मागील ४ वर्षांपासून ते उत्तर प्रदेशमधील डासना तुरूंगात शिक्षा भोगत होते.

तुरूंगाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तलवार दाम्पत्य तुरूंगातून बाहेर येण्याची वाटत पाहत आहेत. तलवार दाम्पत्यांनी रूग्णांची सेवा केल्यामुळे त्यांना मिळणारे मानधन घेण्यास नकार दिला आहे. या दोघांनी ४९,५०० रूपये कमावल्याचे तुरूंग अधीक्षक डी. मौर्य यांनी या सांगितले. तुरूंगातून सुटल्यानंतरही दर १५ दिवसांनी तुरूंगात येऊन कैद्यांवर उपचार करू, असे आश्वासन या दाम्पत्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

तलवार यांच्या नोएडा येथील घरी दि. १६ मे २००८ मध्ये आरूषी तलवार मृत आढळून आली होती. तर हेमराजचा मृतदेह दुसऱ्या दिवशी घराच्या गच्चीवर त्याच्या खोलीत आढळून आला होता.