दिल्लीत १९८४ मध्ये शीखांविरुद्ध भडकलेली दंगल रोखण्यासाठी कॉंग्रेसच्या तत्कालिन सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचा दावा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला असला, तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे त्यावेळी राष्ट्रपती कार्यालयात कार्यरत असेल्या एका अधिकाऱयाने सांगितले. तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी दंगल भडकल्यावर त्यावेळचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजीव गांधी यांनी दूरध्वनी उचललाच नाही, असा दावा ग्यानी झैल सिंग यांच्या माध्यम सचिवांनी केला. शीखविरोधी दंगल सुनियोजित पद्धतीने आखण्यात आली होती, असाही आरोप त्यांनी केला.
इंदिरा गांधींची हत्या सकाळी झाली. मात्र, पहिली दंगल त्यादिवशी संध्याकाळी भडकली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अरूण नेहरू, एच. के. एल भगत, जगदीश टायटलर आणि इतर नेत्यांची एक बैठक झाली. राजीव गांधी कोलकात्याहून परत येण्यापूर्वीच ही बैठक झाली. या बैठकीतच ‘खून का बदला खून’ अशी घोषणा देण्यात आली आणि त्यानंतर दिल्लीतील आयएनए बाजाराजवळ पहिली दंगल भडकली, असे तारलोचन सिंग यांनी सांगितले. सिंग यांनी केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २००४ मध्ये ते राज्यसभेवरही निवडून गेले होते.
सिंग म्हणाले, २००२ साली गुजरातमध्ये भडकलेली दंगल उत्स्फूर्त होती. मात्र, १९८४ ची दंगल सुनियोजितपणे आखण्यात आली होती. गुजरातमधील दंगल रोखण्यासाठी पोलीसांनी सर्व प्रयत्न केले. त्यामुळेच तिथे पोलीसांनी केलेल्या गोळीबारात १३७ लोक मृत्युमुखी पडले. दिल्लीतील दंगलींमध्ये पोलीसांनी केलेल्या गोळीबारात एकच व्यक्ती मृत पावली होती, असेही त्यांनी सांगितले.