पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांच्या प्रश्नात स्वीकारलेला दृष्टिकोन हा निराशाजनक असून आता परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी अमेरिकेनेच मदत करावी, असे मत माजी कायदा मंत्री व भाजपचे माजी नेते राम जेठमलानी यांनी व्यक्त केले. काळा पैसा परत आणण्यात अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यामुळेच अपयश येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अमेरिका-भारत व्यापार मंडळ व इंडियन नॅशनल बार असोसिएशन या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेठमलानी बोलत होते. त्यांनी सांगितले की, परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांवर अमेरिकेने जी कारवाई केली व काही स्वीस बँकांवर खटले भरले त्याचे आपण स्वागतच करतो. भारतीय लोकांचाही काळा पैसा परदेशात अडकलेला असून तो बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने मदत करावी. पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा भारतात आणण्यासाठी जे धोरण अवलंबले आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी काही होणे शक्य नाही. काळा पैसा परत आणण्याचा मोदी यांचा हेतू प्रामाणिक असला तरी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काळा पैसा भारतात आणण्याचा पाठपुरावा गांभीर्याने केला नाही. मोदी यांनी मंत्रिमंडळ जाहीर केले तेव्हापासून अर्थ खाते जेटली यांना देण्यास आपला विरोधच होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram jethmalani blaming arun jaitley for the failure of bringing back black money