‘रसगुल्ला’ या मिठाईच्या मूळ उगमस्थानावरून ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये वाद सुरू असून या वादात ओडिशाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ओडिशा सरकारने समिती स्थापन केली.

ओडिशा राज्य सरकारने रसगुल्ला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विषयांसंदर्भात तीन समित्या स्थापन केल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री प्रदीप पाणिग्रही यांनी दिली. पहिली समिती रसगुल्लाचा उगम शोधणार आहे. रसगुल्ला या मिठाईच्या मूळ स्थानावरून सध्या वाद सुरू असून त्याची सत्यता पडताळण्याचे काम ही समिती करणार आहे. पश्चिम बंगालने ही मिठाई आमच्या राज्यातील असल्याचा दावा केला आहे. मात्र, सादर केलेल्या कागदपत्रांवरून ही मिठाई ओडिशाची असल्याचे स्पष्ट होते, असा दावा पाणिग्रही यांनी केला आहे. या समित्यांना एका आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोलकात्यात मिठाई उत्पादक नवीन चंद्र दास यांनी पहिल्यांदा रसगुल्ला बनविला असा प.बंगालचा दावा आहे, तर १३ व्या शतकात पुरी येथे रसगुल्ल्याचा शोध लागल्याचा दावा ओडिशाने केला आहे.