दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची घोषणा
दूरसंचार कंपन्यांनी व्यवसाय वाढ व ग्राहक हित या दोन्हींचा विचार केला पाहिजे, कॉल ड्रॉप झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
‘दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल सेवा वाढवली आहे त्याबाबत त्यांची मी प्रशंसा करतो, पण त्याचबरोबर त्यांनी सेवेची गुणवत्ता वाढवली पाहिजे. कॉल ड्रॉपच्या तक्रारी आल्या तर मी कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यांना मी ही समस्या समजावून दिली आहे व आता ते प्रतिसाद देत आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.
फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत त्यांनी सांगितले की, कॉल ड्रॉप कमी करण्याच्या प्रश्नावर कंपन्या अनेक उपाय करीत आहेत. त्यांनी चांगली कामगिरी करणे अपेक्षितच आहे. ट्रायने नियामकाचे काम करावे, नियंत्रकाचे नव्हे, अशी सूचना फिक्कीच्या एका प्रतिनिधीने केली असता त्यांनी ट्राय म्हणजे दूरसंचार तक्रार प्राधिकरणाचे समर्थन केले.
‘जर ट्रायने गुणवत्तेची अपेक्षा केली तर कंपन्यांना त्याची पूर्तता करावी लागेल, दुसरीकडे बोट दाखवून चालणार नाही, जर कंपन्यांनी चांगली सेवा दिली तर त्यांच्या पाठीशी उभा राहणारी मी पहिली व्यक्ती असेन हेही लक्षात ठेवा’, असे प्रसाद म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shankar prasad does plainspeak will be tough on call drops