फोर्ट हूड लष्करी तळावर गोळीबार करणारा बंदुकधारी हा मानसिकदृष्टय़ा अस्थिर होता व त्यामुळेच त्याने गोळीबार केला असावा, असे आज सांगण्यात आले. लष्करी तळाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मार्क मिली यांनी सांगितले की, त्याची या गोळीबाराच्या घटनेपूर्वी एका व्यक्तीशी शाब्दिक चकमकही झाली होती. त्याच्या गोळीबारात काल त्याचे तीन सहकारी ठार झाले. प्युटरेरिकोचा इव्हान लोपेझ (वय ३४) याने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. मिली यांनी सांगितले की, लोपेझ याने विशिष्ट लोकांनाच लक्ष्य केले किंवा कसे हे समजू शकले नाही, परंतु त्याने विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य केल्याचे संकेत नाहीत. सध्यातरी आम्ही कुठलीही शक्यता फेटाळत नाही, पण लोपेझ याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे कुठलेही धागेदोरे नाहीत. लोपेझ याने पॉइंट ४५ कॅलिबरची स्मिथ व वेसन सेमी अॅटोमेटिक पिस्तूल १ मार्चला किलीन येथील एका गन स्टोअरमधून खरेदी केली होती. त्याने पिस्तुलाची नोंदणी केलेली नव्हती. मृतांच्या नातेवाइकांचे मिली यांनी सांत्वन करुन श्रद्धांजली वाहिली. आताच्या हल्ल्यात १६ जण जखमी झाले असून त्यांना डार्नेल आर्मी मेडिकल सेंटर व स्कॉट अँड व्हाइट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. चार रूग्णांना उपचारांनंतर सोडून देण्यात आले, तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत असे रूग्णालयाच्या प्रवक्तयाने बेथ वाल्वानो यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता हा हल्ला झाला, त्यानंतर एक महिला लष्करी पोलिस तिथे आली, तिने लोपेझ याला तिच्या दिशेने येताना पाहिले. तो वीस फुटांवर असताना त्याने हात वर केले पण हँडगनने तिच्या दिशेने गोळी झाडली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील गोळीबार अस्थिर मानसिकतेतून
फोर्ट हूड लष्करी तळावर गोळीबार करणारा बंदुकधारी हा मानसिकदृष्टय़ा अस्थिर होता व त्यामुळेच त्याने गोळीबार केला असावा
First published on: 05-04-2014 at 05:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restlessness may be cause of fort hood shooting