नवी दिल्ली : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचा दावा करत शहरात लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. प्राथमिक शाळांचे वर्गही बुधवारपासून पूर्वीप्रमाणे सुरू होतील तसेच, दिल्ली सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलतही बंद करण्यात आली आहे.

गेला आठवडाभर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा स्तर (एक्यूआय) ४०० हून अधिक होता. शनिवार-रविवारी वाऱ्याचा वेग थोडा वाढल्याने तसेच, पंजाबमध्ये शेत जाळण्याच्या प्रकारातही घट झाल्याने प्रदूषण कमी झाले आहे. हवेतील प्रदूषणाची मात्रा शुक्रवारी ४४७ होती, शनिवारी ती कमी होऊन ३८१ व रविवारी ३३९ पर्यंत खालावली. सोमवारी प्रदूषणाचा स्तर ४०० हून कमी होता. दिल्लीतील हवेची गुणवत्ता किंचित सुधारल्यामुळे काही निर्बंध शिथिल करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी दिली.

दिल्लीभर यंत्राद्वारे ठिकठिकाणी पाण्याचे फवारे मारले जात आहेत. सुमारे १५० स्मॉग गनचा वापर केला जाणार असून दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोन स्मॉग गन उपलब्ध करून दिल्या जातील. एका स्मॉग गनमध्ये ७ हजार लिटर पाणी साठवता येते व एका बाजूने दहा किमीच्या परिसरात फवारणी करता येऊ शकते. या पाण्याच्या फवारणीमुळे हवेतील प्रदूषण कमी केले जाते. ट्रकच्या दिल्लीतील प्रवेशावरील बंदी काढून टाकण्यात आली आहे. बांधकामांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले असून बीएस-३ पेट्रोल व बीएस-४ डिझेल प्रकारातील चारचाकी वाहनांवरील बंदीही कायम ठेवण्यात आली आहे.