अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा आज वाढदिवस आहे. निर्मला सितारामण यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत. इंधनाच्या दरांचा संदर्भ देत निर्मला सीतारमण यांना रोहित पवारांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्यात.
ट्विटरवरुन निर्माला सितारमण यांना टॅग करुन रोहित पवारांनी या शुभेच्छा दिल्या. “देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमणजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री @nsitharaman जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना! pic.twitter.com/OD0uzicic8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निर्मला यांना शुभेच्छा दिल्यात. “निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भारतीय अर्थव्यवस्थेमधील अग्रगण्य सुधारणा आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये त्या आघाडीचं नेत्या आहेत. तुमच्या दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणालेत.
Greetings to Finance Minister @nsitharaman Ji on her birthday. She is at the forefront of pioneering reforms that are aimed at transforming the Indian economy and fulfilling the dream of an Aatmanirbhar Bharat. Praying for her long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे, असं मत निर्मला यांनी व्यक्त केलं होतं. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच इंधनदरवाढीला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधन दरात घट होणं कठीण आहे,” असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलंय. “काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्ड्समुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावा लागणार आहे,”असंही अर्थमंत्री निर्मला सितारमण यावेळी म्हणाल्या.