Insta Queen : महिंद्रा थार, रॉयल एनफिल्ड बुलेट, एक कोटींहून जास्त किंमतीची जमीन, दोन आयफोन, रोलेक्स घड्याळ अशा महागड्या वस्तू वापरणाऱ्या निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात ड्रग्ज प्रकरणात तिला सेवेतून कमी करण्यात आलं होतं. आता उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आणि मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी तिला पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने तिला अटक करण्यात आली आहे. तिने गेल्या काही वर्षांमध्ये जी संपत्ती कमावली त्यापेक्षा तिचा खर्च हा २८ टक्के जास्त आहे असं आढळून आलं. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली.

एप्रिल महिन्यात काय घडलं?

१७.७१ ग्रॅम हेरॉईन बाळगल्याप्रकरणी अमनदीप कौरला सेवेतून कमी बरखास्त करण्यात आलं. एनडीपीएसच्या अंतर्गत तिला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर २ मे रोजी जामिनावर तिला सोडण्यात आलं होतं. पंजाब पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार पोलिसांनी तिची मालमत्ता जप्त केली आहे.

अमनदीपची काय काय मालमत्ता जप्त ?

विराट ग्रीन येथील जमीन- किंमत ९९ लाख रुपये

ड्रीम सिटी, भटिंडा येथे जमीन- किंमत १८ लाख १२ हजार रुपये

थार कार – किंमत १४ लाख रुपये

रॉयल एनफिल्ड बुलेट- किंमत १ लाख ७० हजार

आयफोन १३ प्रो मॅक्स- किंमत ४५ हजार रुपये

विवो फोन- २ हजार रुपये

रोलेक्स घडयाळ- किंमत समजलेली नाही

बँकेतील ठेव- १० लाखांहून अधिक आहे

तपासादरम्यान काय काय समोर आलं?

तपासा दरम्यान अमनदीपने २०१८ ते २०२५ या सात वर्षात स्थावर आणि जंगम मालमत्ता कशी जमवली ते सांगितलं. अमनदीप कौरला इन्स्टा क्वीन म्हणूनही ओळखलं जातं. अमनदीप इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. या व्हिडीओंमध्ये अमनदीप दागिने, महागड्या वस्तू दाखवते आहे. अमनदीप कौरचं २०१८ ते २०२४ च्या दरम्यान १ कोटी ८ लाख ३७ हजार ५५० रुपये इतकं होतं. तर तिचा या कालावधीतला खर्च १ कोटी ३९ लाख ६४ हजार ८०२ रुपये होता. तिच्या उत्पन्नापेक्षा तिचा खर्च ३१ लाख २७ हजार २५३ रुपये अधिक होता. तिने वैध मार्गाने कमवलेल्या कमाईच्या तुलनेत ही रक्कम २८ टक्के जास्त आहे. त्यामुळेच ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. तिला अटक करण्यात आली आहे आणि तिची चौकशी करण्यात येते आहे. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिची सगळी मालमत्ता आणि बँक खाती गोठवण्यात आली आहेत.