RSS Chief Mohan Bhagwat says Protection Of Hindus Depends On India’s Unity : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या एकतेवर, एकात्मतेवर जोर देत म्हटलं आहे की भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज व भारत एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांची मुळं खूप खोल आणि घट्ट आहेत. हिंदू समाज सशक्त होईल तेव्हाच भारतही मजबूत होईल आणि त्यातून भारताला सन्मान मिळेल, भारताची दखल घेतली जाईल.

आरएसएसचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर वीकली’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवलं. तसेच त्यांनी मानवाधिकार संघटनांच्या मौनावरून प्रश्न उपस्थित केले. “हिंदू समाज सशक्त होत नाही तोवर जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. कोणीच त्यांची दखल घेणार नाही”, असं ते म्हणाले.

“हिंदू समाज एकवटला, सशक्त झाला तर जगभरातील हिंदूंना त्यातून बळ मिळेल”

मोहन भागवत म्हणाले, “हिंदू समाज व भारत एकमेकांशी खूप घट्ट आणि खोलपर्यंत जोडलेले आहेत. हिंदूंच्या प्रतिष्ठेतूनच भारताला गौरवप्राप्ती होईल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत ते देखील कधीकाळी हिंदू होते. तरीदेखील त्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्याची शमता व इच्छा केवळ हिंदूंमध्येच आहे आणि हिंदू सुमदाय ती इच्छा दाखवत आला आहे. भारतातील हिंदू समाज एकवटला, सशक्त झाला तर जगभरातील हिंदूंना त्यातून बळ मिळेल. भारतही मजबूत होईल. हे काम चालू आहे. अद्याप आमचं काम पूर्ण झालेलं नाही. हळूहळू ते पूर्ण होऊन निश्चितच विकसित देश घडवण्यास मदत मिळेल”.

…तोवर आपला लढा चालू ठेवावा लागेल : भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष म्हणाले, “बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पूर्वीपासून ते घडतंय. परंतु, यावेळी त्याविरोधात जो संताप व्यक्त झाला तो यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. बांगलादेशमधील हिंदू म्हणत आहेत की ते आता पळून जाणार नाहीत. ते म्हणतायत आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू, आम्ही पळून जाणार नाही. हिंदू समाजाची ताकद वाढत आहे. त्यांचं संघटन होत आहे. ही ताकद आणखी व्यापक होईल. हिंदू सुरक्षेचं ध्येय पूर्ण होईपर्यंत आपल्याला आपला लढा चालू ठेवावा लागेल”.

दरम्यान, मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं की “संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य होईल ते सगळं काही करेल. ते करत असताना आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केलं जाईल. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतात. त्यानुसार ते काम करतील”.