Huge Rush at Air India Plane Crash Site : अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून) एअर इंडियाचं एक विमान कोसळलं. या दुर्घटनेत २७४ जणांचा बळी गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी अनेकांची ओळख पटवता आलेली नाही. यासाठी आरोग्य विभाग मृतदेह व मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या करत आहे. देश या घटनेतून सावरलेला नाही. मात्र, काही अतिउत्साही लोकांकडून या घटनेबाबत अप्रत्यक्षपणे असंवेदनशीलता पाहायला मिळत आहे. कारण या दुर्घटनेनंतर दररोज हजारो लोक घटनास्थळाकडे धाव घेत आहेत.

दुर्घटनास्थळाचे फोटो काढण्यासाठी, तिथे जाऊन स्वतःचे सेल्फी काढण्यासाठी, दुर्घटनास्थळी स्वतःचं फोटोशूट करण्यासाठी दररोज हजारो लोक घटनास्थळी जमत आहेत. सतत तिथे शेकडो लोक एकाच वेळी जमलेले दिसतात. लोकांची या रहिवासी भागात वर्दळ वाढल्याने स्थानिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

काही लोकांकडून दुर्घटनास्थळी फोटोशूट करून असंवेदनशीलतेचं दर्शन

या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच विमान मेघानी नगरमधील ज्या रहिवासी भागात कोसळलं तिथले ३३ जण यामध्ये मरण पावले आहेत. त्यामुळे मेघानी नगरमधील रहिवासी मोठ्या धक्क्यात आहेत. मात्र, आसपासच्या भागातील काही लोक दुर्घटनास्थळी जाऊन तिथे फोटोशूट करून असंवेदनशीलता दर्शवत आहेत.

लोकांचा समाजमाध्यमांवर संताप

एका बाजूला या दुर्घटनेमुळे देशात शोकाकूल वातावरण असताना काहीजण असंवेदनशीलपणे वागत असल्याचं पाहून अनेकांनी समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला आहे. यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंची देखील या ठिकाणी बरीच गर्दी वाढली आहे. स्थानिकांनी प्रसारमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली आहे.

विमानाचे फोटो काढण्यासाठी घरांच्या गच्चीवर जाण्याचा प्रयत्न

विमानाचा फोटो काढण्यासाठी अनेकजण आसपासच्या लोकांच्या घरांच्या व इमारतींच्या गच्चीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही पत्रकार थेट लोकांचे दरवाजे ठोठावत आहेत. ‘मला केवळ एक फोटो काढायला तुमच्या घराच्या गच्चीवर जाऊ द्या’ अशी विनंती करत आहेत. फोटो काढण्यासाठी आलेले लोक व पर्यटक सतत घराचे दरवाजे ठोठावत असल्यामुळे स्थानिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.