Russia Air Strike in Ukraine : उत्तर युक्रेनच्या सुमी प्रांतात रशियाने मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने एका प्रवासी रेल्वेवर आणि रेल्वेस्थानकावर हल्ला केला होता, ज्यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा निर्दयी हल्ला असल्याचं वक्तव्य केलं आहे. या हल्ल्याची माहिती देताना स्थानिक गव्हर्नर ओलेह हीहोरोव्ह यांनी सांगितलं की रशियाने शॉस्टका रेल्वे स्थानकावर हल्ला केला. त्याचवेळी शाॉस्टकावरून कीवला जाणारी एक ट्रेन रेल्वेस्थानकावर दाखल झाली होती. या ट्रेनलाही लक्ष्य केलं गेलं.
झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर शॉस्टका रेल्वेस्थानकावरील स्थितीचा एक व्हिडीओ समाजमाध्यांवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेली व पेटत असलेली रेल्वे दिसत आहे. यासह कॅप्शनमध्ये झेलेन्स्की यांनी लिहिलं आहे की रशियाने सुमी प्रांतातील शाॉस्टका रेल्वे स्टेशनवर ड्रोनद्वारे हल्ला केला. सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि लोकांची मदत केली जात आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात ३० जण ठार झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की हल्ला झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. हल्ल्यानंतर बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आसून बचावकार्य चालू आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र, जखमींची अधिकृत संख्या समजलेली नाही.
आदल्या दिवशी रशियाक़डून युक्रेनवर क्षेपणास्र हल्ला
रशिया मागील दोन महिन्यांपासून युक्रेनमधील पायाभूत सुविधांवर हल्ला करत आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून रशियन हवाई दलाने शनिवारी रात्री युक्रेनमधील शॉस्टका रेल्वेस्थानकावर ड्रोनद्वारे बॉम्बवर्षाव केला. गेल्या दोन महिन्यांपासून रशियाकडून युक्रेनच्या वाहतूक नेटवर्कवर हल्ले केले जात आहेत. शनिवारचा हल्ला हा त्याच योजनेचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
या हल्ल्याच्या एक दिवस आधी रशियाने खार्कीव्ह व पोल्टाव्हा प्रदेशातील युक्रेनच्या सरकारी गॅस व तेल कंपनीवर हल्ला केला होता. नाफ्टगोझच्या सुविधांवर ३५ क्षेपणास्रे व ६० ड्रोन हल्ले करण्यात आले होते. नाफ्टगोझचे सीईओ सर्गेई कोरेल्स्की यांच्या मते शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रात्री झालेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. त्यामुळे गॅस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.