Russia backs India amid US Donald trump tariff threat : रशियाकडून तेल घेऊन आणि त्याची विक्री करून भारत मोठा नफा कमावत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे भारतीय मालावरील आयातशुल्क ‘मोठ्या प्रमाणात’ वाढविण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यानंतर रशियाने त्यांच्याकडून भारत करत असलेल्या तेल आयातीवर बेकायदेशीर व्यापार दबाव आणल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे.
“आम्ही अशी अनेक वक्तव्य ऐकली आहेत जी खरंतर धमक्या आहेत, हा देशांनी रशियाबरोबरचे व्यापार संबंध तोडावेत यासाठीचे प्रतत्न आहेत. आम्ही अशी विधाने कायदेशीर मानत नाहीत,” असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमीत्री पेस्कोव्ह यांनी माध्यमांना सांगितले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी सार्वभौम देशांना त्यांचे व्यापर भागिदार निवडण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हटले. पेस्कोव्ह म्हणाले की, “आमचा विश्वास आहे की सार्वभौम देशांना त्यांचे स्वत:चे व्यापारी, व्यापर आणि आर्थिक सहकार्यासाठीचे भागीदार निवडीचा आणि एखाद्या विशिष्ट देशाच्या हितासाठी त्यांच्याबरोबर व्यापार आणि आर्थिक संबंध कोणत्या स्वरूपाचे हवेत हे निवडण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो आहे.”
मॉस्कोने युक्रेनबरोबरील संघर्ष संपवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर रशियावर आणि रशियाकडून एनर्जी एक्सपोर्ट्स खरेदी करणारे देश यांच्यावर नव्याने बंधने लादणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी शुक्रवीर केली आहे. असे असले तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाबाबत त्यांची भूमिका जराही बदललेली नाही.
तर दुसरीकडे भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीच्या धमक्यांवर भारताने देखील भूमिका स्पष्ट केली आहे. “या पार्श्वभूमीवर भारताला सातत्याने लक्ष्य करत राहाणं हे अन्याय करणारं आणि अतार्किक आहे. दुसऱ्या कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच भारतदेखील या परिस्थितीत आपलं राष्ट्रीय हित व आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलेल”, असे भारताने म्हटले आहे.
ट्रम्प काय म्हणाले होते?
रशियाकडून तेल घेऊन आणि त्याची विक्री करून भारत मोठा नफा कमावत असल्याचा आरोप करत भारतीय मालावरील आयातशुल्क ‘मोठ्या प्रमाणात’ वाढविण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. रशियाने लादलेल्या युद्धात युक्रेनचे किती नागरिक मरत आहेत, याची भारताला चिंता नाही. त्यामुळेच भारताकडून अमेरिकेला दिले जाणारे शुल्क आता प्रचंड वाढविले जाणार आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत हा इशारा दिला आहे.