एपी, कीव्ह

रशियाने युक्रेनच्या राजधानीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रविवारी मोठा हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यापासूनचा रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले. रशियाने ८०५ ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर केला.

युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनात यांनी सांगितले, की रशियाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला होता. रशियाने ड्रोनसह १३ वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचाही वापर केला. युक्रेनने ७४७ ड्रोन्स आणि ४ क्षेपणास्त्रे निकामी केले. युक्रेनच्या ३७ भागांना ५६ ड्रोन आणि नऊ क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. कीव्हमधील मंत्रिमंडळाच्या इमारतीतून धूर येत होता. रशियाने आतापर्यंत सरकारी इमारतींना लक्ष्य करणे टाळले होते. त्यामुळे इमारतीतून धूर ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांमुळे येत होता, की अन्य काही कारणांमुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. या इमारतीत युक्रेनमधील मंत्र्यांची घरे आहेत. इमारतीतून धूर येऊ लागल्यानंतर पोलिसांनी इमारतीकडे जाणारे रस्ते अडवून धरले. या हल्ल्यात दोन जण ठार, तर १५ जण जखमी झाले. मृतांत एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

युक्रेनचे पंतप्रधान युलिया स्विरीदेंको म्हणाले, ‘शत्रूच्या हल्ल्यात प्रथमच सरकारी इमारतींचे नुकसान झाले. वरच्या मजल्यावरील छपराचे यात नुकसान झाले. या इमारती आम्ही पुन्हा बांधू. पण, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना परत आणता येणार नाही. जगाने आता तरी केवळ शब्दांत व्यक्त होणे थांबवावे आणि कृती करावी. रशियावर निर्बंधांतून अधिक दबाव टाकायला हवा.’

युक्रेन-रशिया युद्ध थांबल्यानंतर युक्रेनसाठी २६ मित्रदेशांनी ‘पुनर्हमी दल’ म्हणून सैन्य पाठविण्याची तयारी दर्शवल्यानंतर रशियाने हा मोठा हल्ला केला. तत्पूर्वी युरोपीय नेत्यांनी पुतिन यांना हे युद्ध संपविण्याचे आवाहन केले.