Russian Woman Found in Cave : नीना कुटिना हे नाव देशात गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. कारण नीना कुटिना ही तिच रशियन महिला आहे जी ११ जुलैच्या दरम्यान गोकर्णच्या जंगलात पोलिसांना तिच्या दोन मुलींसह सापडली होती. आपण गोकर्णच्या जंगलातील या गुहेत आठ वर्षांपासून वास्तव्य करत असल्याचं या महिलेने पोलिसांना आणि रेंजर्सना सांगितलं. मात्र या ठिकाणी असलेल्या हिंस्र जनावरांचा धोका आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन तिला तिच्या दोन मुलींसह बाहेर काढण्यात आलं. सध्या तिला एका आश्रमात ठेवण्यात आलं आहे. तिचा पार्टनरही भारतात येऊन गेला. त्याचं नाव ड्रोर गोल्डस्टिइन असं आहे. दरम्यान ही महिला आठ वर्षे या गुहेत कशी राहिली? तिने हा मार्ग का निवडला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
२०१७ मध्ये संपला नीना कुटिनाचा व्हिसा
नीना कुटिनाने दिलेल्या माहितीनुसार ती २०१६ मध्ये भारतात आली होती. सुरुवातीला ती गोव्यात राहिली. बिझनेस व्हिसा घेऊन ती भारतात आली होती. २०१७ मध्ये तो व्हिसा संपला मात्र नीना भारतातच राहिली. गोकर्णच्या जंगलात असलेल्या ज्या गुहेत नीना तिच्या दोन मुलींसह सापडली ती गुहा म्हणजे तिचं घर, तिचं मंदिर, तिचं स्वयंपाकघर सगळं काही होतं. या गुहेत आपण आठ वर्षे राहिलो असं या महिलेने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
रशियातून रामतीर्थ येथील गुहा, आठ वर्षे या महिलेने कशी काढली?
रशियातून थेट गोव्यात आणि तिथून रामतीर्थ येथील गुहेत आलेल्या या महिलेने ती गुहा हेच आपलं घर बनवलं. तिने मोठं घर बांधून राहण्यापेक्षा आणि आरामाचे बरेच पर्याय निवडण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणं पसंत केलं. गुहेत ना वीज होती ना फोन किंवा कुठलंही संदेश मिळण्याचं साधन. तरीही साधारण आठ वर्षे नीनाने या गुहेत काढली. अध्यात्मिक वातावरण आणि निसर्ग यांच्या सान्निध्यात राहिल्याचा आनंद वेगळा आहे हे समजून घेत तिने हा पर्याय निवडला. तिच्या दोन मुलीही याच गुहेत लहानाच्या मोठ्या झाल्या. पावसाळा सुरु होण्याच्या आधी ती कोरडे पदार्थ साठवण करुन ठेवत होती. तसंच गुहेत आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही तिने जमवल्या होत्या. निसर्गासह राहणं नीनाने पसंत केलं होतं त्यामुळे तिने चूल पेटवून स्वयंपाक करण्याचं कौशल्यही शिकून घेतलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहेत प्लास्टिकच्या दैनंदिन गरजेसाठी लागणारी प्लास्टिक शीट्स, आवश्यक असलेली स्वयंपकाची साधनं आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठीची काही मोजकी साधनं या सगळ्या गोष्टी नीना ज्या गुहेत राहात होती तिथे मिळाल्या.
नीना आठ वर्षांपासून या गुहेत नेमकं काय खाऊन राहिली?
नीनाने तिचा आहार अगदी साधा ठेवला होता. भात, वरण, नूडल्स आणि मोसमानुसार मिळणारी फळं या गोष्टी खाऊन तिने गुजराण केली. रोज प्यायचं पाणी ती नैसर्गिक स्त्रोतांमधून मिळवत होती. तसंच जवळ असलेल्या झऱ्यांखाली ती आणि तिच्या मुली अंघोळ करत असत. याची माहिती नीनाने दिली होती असंही पोलिसांनी वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच रोज नीना योग करत असेल. त्यानंतर मंत्रोच्चार करत असे, तसंच गाणी म्हणत असे, चित्र काढत असे अशीही माहिती पोलिसांनी दिली. तसंच तिच्या मुलींना तिने चित्र काढण्यास, चित्र रंगवण्यास शिकवलं होतं. मुलींना भाषा जमली पाहिजे म्हणून ती त्यांच्याशी संवाद साधत असे. या गुहेतल्या एका भागात रशियन पुस्तकंही ठेवली होती. तसंच हिंदू संस्कृतीत पूजल्या जाणाऱ्या काही मूर्तीही ठेवल्या होत्या.
नाग आणि साप आमचे मित्र-नीना कुटिना
नीना कुटिना ज्या भागात राहात होती तो भागा साप, नाग, वन्य प्राणी, हिंस्र प्राणी यांच्यासाठी आणि दरड कोसळण्याच्या घटनांसाठी ओळखला जातो. मात्र गुहेत आपल्याला आणि आपल्या मुलींना सुऱक्षित वाटेल असं वातावरण तिने तयार केलं होतं. तिने पोलिसांना सांगितलं की साप आणि नाग हे आमचे मित्र आहेत ते आम्हाला काहीही करत नाहीत. कुठल्याही प्राण्याला जर आपण इजा केली नाही किंवा त्याला धोका वाटेल असं वर्तन केलं नाही तर तो काहीच करत नाही यावर माझा विश्वास आहे असं नीनाने सांगितलं. तसंच इथे येऊन मी आणि माझ्या मुली निसर्गाशी एकरुप होऊन जगत होतो असंही तिने पोलिसांना सांगतिलं.
नीना आणि तिच्या मुलींचा शोध योगायोगाने लागला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामतीर्थ डोंगर आणि गोकर्णच्या जंगलात जिथे ही गुहा आहे तिथे दरड कोसळण्याची घटना घडल्याची माहिती रेंजर्स आणि पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्या भागात काय घडलं आहे? कुणी अडकलं तर नाही ना? यासाठी टेहळणी सुरु केली. या दरम्यान नीना आणि तिच्या मुली गुहेत वास्तव्य करत होत्या अशी माहिती त्यांना मिळाली. ज्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. आमचं गुहेतलं आयुष्य खूप सुखाचं होतं असं नीनाने सांगितलं. सुरुवातीला ती बाहेर यायला तयार नव्हती. पण पोलिसांनी तिला एका योग करणाऱ्या महिलेच्या मदतीने बाहेर काढलं.