Azam Khan out of Jail : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे आज म्हणजेच २० मे २०२२ रोजी तुरुंगाबाहेर आले. ते मागील दोन वर्षांपासून उत्तर प्रदेशमधील सीतापूर तुरुंगामध्ये होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवपाल यादव आणि मुलगा अब्दुल्ला खान सीतापूर तुरुंगाबाहेर पोहोचले होते. सध्या सामाजवादी पक्षाचे मोठे नेते आझम यांच्यापासून दूरच असल्याने इतर कोणीही यावेळी उपस्थित असल्याचं दिसून आलं नाही. आझम खान हे सीतापूर तुरुंगामधून थेट सपाचे माजी आमदार अनूप गुप्ता यांच्या घरी पोहोचले. अनूप गुप्ता हे आझम खान यांचे निटवर्तीय आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आझम खान यांच्या सुटकेच्या आधी प्रगतिशील समाजवादी पार्टीचे प्रमुख शिवपाल यादव यांनी एक ट्विट केलं होतं. “प्रांतातील जनतेसाठी हे फार सुखद आहे की आझम खान आज त्यांच्या चाहत्यांमध्ये येणार आहे. मी सीतापूरसाठी रवाना झालोय. उत्तर प्रदेशच्या क्षितिजावर नवीन सूर्य उदयास येत आहे. चला आझम खान यांचं स्वागत करुयात,” असं शिवपाल यांनी म्हटलंय.

आझम खान यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. आझम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोणत्याही प्रकारची वक्तव्य करु नयेत असे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळेच तुरुंगातून बाहेर पाडल्यानंतर ते गाडीच्या काचाही खाली न करता निघून गेल्याचं पहायला मिळालं. सकाळी आठ वाजता त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं.

आझम यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, असं म्हटलंय. अब्दुल्ला हे त्यांचे बंधू अदीब आझम यांच्यासोबत वडिलांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी सकाळीच सितापूर तुरुंगाबाहेर पोहोचले होते. आझम खान यांच्या सुटकेच्या वेळेस त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आझम खान यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ईदप्रमाणे आनंद साजरा करत दुहेरी ईद साजरी केलेली. आज आझम खान यांची सुटका झाल्याने आजही आमच्यासाठी ईदप्रमाणेच आहे, असं समर्थकांचम् हणणं आहे.

दुसरीकडे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवपाल यादव यांनी आझम खान यांनी आमच्यासोबत रहावं अशी इच्छा बोलून दाखवलीय. ते तुरुंगात असताना आपण त्यांना दोनदा भेटायला गेलो होतो. आम्ही दोघे बऱ्याच विषयांवर बोललोय, ते आमचे सहकारी आहेत, असंही शिवपाल म्हणाले.

आझम खान यांना एक दिवसापूर्वीच अंतरिम जामीन मंजूर झालाय. त्यांच्यावर ८९ वेगवेगळ्या प्रकारचे खटले सुरु आहेत. त्यामुळे त्यांना २७ महिने तुरुंगात रहावं लागलं. २६ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना अटक करण्यात आलेली. त्यांची पत्नी आणि मुलंही तुरुंगामध्ये होती. त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर झालाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party leader azam khan released from sitapur district jail scsg
First published on: 20-05-2022 at 09:58 IST