वर्ल्डकप २०१९ मधील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शोएबच्या निवृत्तीनंतर पत्नी सानिया मिर्झाने भावनिक टि्वट केले आहे.

प्रत्येक कथेला शेवट असतो पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली २० वर्ष अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे असे सानियाने टि्वटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानने काल बांगलादेशवर विजय मिळवला पण धावगतीमुळे वर्ल्डकपमधील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ३७ वर्षीय शोएब मलिकने गेली २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले.

२००७ ते २००९ दरम्यान तो पाकिस्तानचा कर्णधारही होता. १९९९ साली वेस्ट इंडिज विरुद्ध शोएबने वनडेमध्ये तर २००१ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१९ विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शोएबने २०१५ सालीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१८ साली शंभर ट्वेंटी-ट्वेंटीचे सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला.