Prince Alwaleed bin Khaled: सौदी अरेबियाचे राजकुमार अलवलीद बिन खालिद बिन तलाल यांचा शनिवारी (१९ जुलै) वयाच्या ३६ व्या वर्षी मृत्यू झाला. ‘द स्लीपिंग प्रिन्स’ या नावाने प्रसिद्ध असलेले राजकुमार अलवलीद हे १५ वर्षांचे असताना लंडन येथे एका कार दुर्घटनेनंतर कोमात गेले होते. त्यानंतर जवळपास दोन दशक ते कोमामध्ये होते. कोमात असतान त्यांचा मृत्यू झाला. सुमारे २० वर्ष ते रियाध येथे लाइफ सपोर्टवर होते. या काळात त्यांना एकदाही शूद्ध आली नाही.

राजकुमार अलवलीद बिन खालिद यांचे वडील प्रिन्स खालेद बिन तलाल बिन अब्दुलअझीझ यांनी त्यांच्या मुलाच्या निधनाची बातमी दिली. एक्सवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कुरान मधील काही ओळी उद्धृत केल्या. देवाने माझ्या मुलाचा शांत राहिलेला आत्मा स्वीकारावा आणि त्याला स्वर्गात प्रवेश द्यावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

राजकुमार अलवलीद बिन खालिद बिन तलाल यांचा जन्म १८ एप्रिल १९९० मध्ये झाला होता. सौदीतील शाही परिवारातील प्रमुख सदस्य प्रिंस खालिद बिन तलाल यांचे ते मोठे सुपुत्र होते. सौदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुलअझीज यांचे ते पणतू होते.

लंडनमधील एका सैनिकी महाविद्यालयात शिकत असताना २००५ साली राजकुमार अलवलीद यांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. ज्यामुळे ते कोमामध्ये गेले. त्यानंतर त्याना रियाध येथील अब्दुलअझीज मेडिकल सिटीत आणले गेले तिथे ते व्हेटिंलेटर आणि फिडिंग ट्यूबवर होते.

दरम्यान शाही परिवाराने जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकत नामांकित डॉक्टरांची मदत घेतली. अनेक प्रयत्न करूनही राजकुमार अलवलीद यांना शूद्ध आली नाही. २०१५ साली डॉक्टरांनी राजकुमार अलवलीदचा लाइफ सपोर्ट काढून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र वडील खालीद यांनी त्यास नकार दिला. आपला मुलगा एक ना एक दिवस शुद्धीत येईल, असा त्यांना विश्वास होता. मात्र अखेर शनिवारी राजुकमार अलवलीदचे निधन झाले.

वडिलांनी आशा सोडली नाही

अलवलीद यांचे वडील प्रिन्स खालीद यांनी २० वर्षांत कधीही आशा सोडली नाही. या २० वर्षांत जेव्हा केव्हा अलवलीद यांच्या बारीक हालचाली दिसायच्या तेव्हा त्यांच्या मनात आशा निर्माण व्हायची. आपल्या लाडक्या मुलाला पुन्हा मिठीत घेता येईल, त्याच्याशी बोलता येईल, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. देवावर विश्वास ठेवून त्यांनी उपचारात कधीही खंड पडू दिला नाही.

२०१९ साली आशा पल्लवीत

२०१९ साली अलवलीद यांनी हाताच्या बोटांची हालचाल केली आणि डोकंही हलवले होते. अशा बारीक सारीक हालचाली झाल्यानंतर कुटुंबाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा दिसली नाही.