‘फोर्ब्स’ मासिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आणि आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी स्थान मिळविले आहे. यंदा जगातील सर्वात सामर्थ्यशाली महिला होण्याचा मान जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी मिळवला आहे. ‘फोर्ब्स’ मासिकातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाची विशेष छाप पाडणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली जाते. जगातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी ३६वे, तर चंदा कोचर यांनी ४३वे स्थान पटकावले आहे. तसेच भारतातील बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मझुमदार- शॉ यांनीसुद्धा यादीमध्ये ९२वा क्रमांक मिळविला आहे. पेप्सिको इंडियाच्या प्रमुख इंद्रा नुयी (१३) आणि ‘सिस्को’च्या मुख्य तंत्रज्ञान आणि धोरण अधिकारी पद्मश्री वॉरियर (७१) यांचासुद्दा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अँजेला मर्केल यांच्यापाठोपाठ अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या अध्यक्ष जॅनेट येलेन आणि सामाजिक कार्यकर्त्या मेलिंडा गेटस् यांनी स्थान मिळवले आहे. पहिल्या दहा महिलांमध्ये अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बॅरा , अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची पत्नी मिशेल ओबामा आणि फेसबुकच्या शेरियल सँडबर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbis arundhati bhattacharya icicis chanda kochhar among forbes most powerful women