Parliament Winter Session 2023 Updates : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्ती लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांच्या हातात दोन कॅन होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. खासदारांनीच या दोघांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण हा धूर जर विषारी असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली आहे. तसेच संसदेची नवी इमारत सुरक्षेच्यादृष्टीने इतकी कमकुवत कशी? असाही प्रश्न विरोधी खासदारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो धूर विषारी असता तर…

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सभागृहात घडलेला प्रसंग कथन केला. ते म्हणाले, “दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली. त्यांच्या हातात कॅन होते. त्यातून पिवळा धूर येत होता. दोघांपैकी एक जण अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही काहीतरी घोषणा देत होते. पण त्या मला समजू शकल्या नाहीत. पण दोन लोक सुरक्षा भेदून आतमध्ये येतात, सभागृहात उड्या मारून धूर सोडतात, याला काय म्हणायचे. कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्बही असू शकला असता. आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.”

नव्या संसदेतही हल्ला होतो, हे दुर्दैवी

काँग्रेसचे लोकसभा नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही सभागृहात घडलेला प्रसंग कथन केला. ते म्हणाले, “दोन लोक प्रेक्षक गॅलरीतून संसदेत उतरले. त्यांच्या हातात दोन कॅन होते, त्यातून धूर निघत होता. आम्ही खासदारांनीच मिळून दोघांनाही पकडले. त्यानंतर सुरक्षा रक्षक आतमध्ये धावत आले. आज सकाळीच आम्ही २००१ च्या हल्लाचे स्मरण करून शहीदांना अभिवादन केले. आज नव्या संसद भवनातही हल्ला झाला. त्यामुळे सुरक्षेत हलगर्जीपणा झाला, हे सत्य आहे.”

पत्रकार किंवा प्रेक्षक टॅग लावत नाहीत

“अनेक लोक संसदेत येतात. पत्रकार आणि सामान्य लोकही येतात. पण त्यांच्या गळ्यात काहीही टॅग नसतो. लोक अक्षरशः एकमेकांना धक्का मारत जातात. सरकारने यावर काहीतरी उपाययोजना राबविली पाहीजे. आतमध्ये काहीही होऊ शकले असते. नव्या संसद इमारतीमध्ये खासदारांची सुरक्षा चांगली असायला हवी”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाच्या नेत्या खासदार डिम्पल यादव यांनी दिली.

आधी खांबाना लटकले आणि मग उडी मारली

शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या प्रसंगाचे वर्णन केले. ते म्हणाले, शून्य प्रहराचे कामकाज तेव्हा चालू होते. दोन इसम प्रेक्षक गॅलरीतून उठले आणि सभागृहात असलेल्या खांबाला लटकत होते. त्यानंतर त्यांनी खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर त्यांनी बाकावरून उड्या मारायला सुरुवात केली. खासदारांनी चारही बाजूंनी त्यांना घेरल्यानंतर त्यांची धांदल उडाली. त्याच्यातील एकाने पायातील बुट काढले, तोपर्यंत खासदारांनी त्याला पकडले. दुसऱ्याला इसमालाही खासदारांनीही पकडले. दरम्यान सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर पसरला. कदाचित तो धूर त्या बुटातून येत होता.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security breach two men jump into lok sabha from gallery mps say they sprayed a gas no security in new parliament kvg