पाकिस्तानचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याबद्दल कन्नड अभिनेत्री दिव्या स्पंदन उर्फ रम्या यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली होती. मात्र, रम्याने आपण पर्रिकर यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तान हा नरक नसून एक चांगला देश आहे. पर्रिकर यांचे विधान चुकीचे आहे. पाकिस्तानमधील नागरिकही आपल्यासारखेच आहेत. मी भारतातून आले आहे, हे समजल्यानंतर त्यांनी खूप चांगल्याप्रकारे माझे आदरातिथ्य केल्याचे रम्या यांनी म्हटले होते. या विधानानंतर त्यांच्यावर टीकेला सुरूवात झाली होती.
काँग्रेसच्या माजी खासदार असणाऱ्या रम्या या नुकत्याच सार्क परिषदेच्यानिमित्ताने पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. यावेळी रम्या यांनी पाकिस्तानी जनतेच्या आदरातिथ्याचे कौतूक केले होते. पाकिस्तानमधील नागरिकही आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली. रम्याने पाकिस्तानची स्तुती केल्याने तिच्याविरोधात वकील विठ्ठल गौडा यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी शनिवारी होणार आहे. दरम्यान, रम्या यांनी याप्रकरणात माफी मागण्यास नकार दिला असून देशद्रोहाच्या कायद्यात बदल करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सध्याच्या काळात देशद्रोहाचा आरोप होणे, ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. रम्याने २०११ मध्येही ट्विटरवर राष्ट्रविरोधी वक्तव्य केले केल्यानंतर तिच्यावर खूप टीका करण्यात आली होती. काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये सध्या देशद्रोहाच्या खटल्यांवर खूप चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sedition case filed against actor ramya for pakistan is not hell remark