नग्न करून लैंगिक छळ करण्यात आला
काश्मीरमध्ये चोरीच्या आरोपावरून अटक केलेल्या महिलेने तिला पोलिस स्टेशनमध्ये नग्न करून लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अठ्ठावीस वर्षांच्या या विवाहित महिलेला न्यायालयाने जामीन दिलेला असतानाही तिला जम्मू शहरानजीकच्या कनाचक पोलिस चौकीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिने सांगितले, की मला नग्न करून बीअरची बाटली व तिखटाची पावडर गुप्तांगात घालण्यात आली. स्टेशन अधिकारी व महिला कॉन्स्टेबल यात सामील होते.
पोलिसांनी या घटनेची पोलिस अधीक्षक पातळीवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही महिला दोमाना भागात मोलकरीण म्हणून काम करीत होती तेव्हा तिने ३० एप्रिलला मालकाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याचे आरोप होते. तिने सांगितले, की महिला पोलिस स्टेशनला पाठवण्यापूर्वी चार दिवस माझा अतोनात छळ करण्यात आला. माझा पती व सासू यांना पोलिसांनी मारहाण केली.
महिलेची बाजू मांडणारे वकील विजयकुमार अत्री यांनी सांगितले, की पोलिसांनी वैद्यकीय अहवालातील माहिती बदलली आहे व पोलिस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जम्मू न्यायालयाने पोलिस महानिरीक्षकांना या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले आहे. पोलिस महानिरीक्षक आता तीन सदस्यांचे पथक नेमून पंधरा दिवसांत अहवाल सादर करतील.
न्यायालयाने या महिलेला वैद्यकीय उपचार देण्यात दिरंगाई करू नये असे म्हटले आहे. कनाचकचे पोलिस अधिकारी राजेश शर्मा यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळले आहेत. जम्मूतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जात आहे. आता महिलेच्या लैंगिक छळाचा तपास ग्रामीण पोलिस अधीक्षकांना, तर चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षकांना देण्यात आला आहे.