राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळय़ादरम्यान सनातन धर्माचे पालन होत नसल्याचे कारण देत दोन पीठांच्या शंकराचार्यानी २२ जानेवारीला अयोध्येमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती तसेच पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी आपण मोदीविरोधी नसल्याचे स्पष्ट करतानाच धर्मशास्त्राविरुद्ध जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे प्रतिष्ठापना सोहळय़ास उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गुरुवारी पश्चिम बंगालमधील हावडा येथे आले असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे आणि रामचंद्र हे धर्मनिरपेक्ष नव्हते, या धारणेला अनुसरून भक्ती केली गेली पाहिजे. धर्मग्रंथांनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही, तर सैतानी शक्तींचा प्रवेश होतो आणि सर्वत्र गोंधळ माजतो,’ असे निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>सीमेवरील परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील ; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे पूर्व लडाखमधील स्थितीबाबत प्रतिपादन
तर २०२२ मध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर शंकराचार्य झालेले अविमुक्तेश्वरानंद बुधवारी हरिद्वारमध्ये म्हणाले, की चारही शंकराचार्याची कोणाच्याही विरोधात कटुभावना नाही. पण हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्याची जबाबदारी आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे स्वरूपानंद सरस्वती यांनी अधोरेखित केले. ष्टद्धr(२२४)ृंगेरी शारदापीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारिकापीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या अन्य दोन पीठाच्या शंकराचार्यानी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
आम्ही आता गप्प बसू शकत नाही. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करणे आणि तेथे देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे ही अशुभ कल्पना आहे. आम्ही मोदीविरोधी नाही. पण आम्ही धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही.- स्वामी अविमुक्तेश्वरानंद, ज्योतिषपीठाचे शंकराचार्य
अयोध्येतील राममंदिर रामानंद संप्रदायाचे आहे. शैव, शाक्य आणि संन्याशांचे नाही. रामानंद पंथाने केवळ विष्णू अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले होते.- चंपत राय, सरचिटणीस, राममंदिर विश्वस्त मंडळ
