जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात असेलेल्या शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना काश्मीर पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हा चौक अत्यंत संवेदनशील असून अनेकदा हा भाग हिंसाचारामध्ये होरपळून निघाला आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाहून राष्ट्रध्वज फडकवण्यात परवानगी देण्यात येत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे काही कार्यकर्ते लाल चौकातील ‘घंटा घर’ परिसरात दोन दुचाकीवरुन आले होते. यानंतर राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कोटीबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. येथे कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर सोडून देण्यात आले.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी गेल्या आठवड्यात पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच केंद्र सरकार आणि भाजप पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकावण्याची भाषा करतात. त्यांनी आधी श्रीनगरमधील लाल चौकात जाऊन तिरंगा फडकावून दाखवावा. ते हेच करु शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलतात असेही अब्दुल्ला म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या जम्मू शाखेने एका खास पथकाद्वारे ऐतिहासिक लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला.