शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बहिष्कार घातला आहे. एअर इंडियासह कोणत्याही कंपनीकडून विमानाचे तिकीट दिले जात नसल्याने आता रवींद्र गायकवाड यांच्याकडून विमान तिकीट आरक्षित करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता एअर इंडियाकडून तिकीट आरक्षित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. रवींद्र गायकवाड यांच्याकडून नावाची स्पेलिंग बदलून तिकीट आरक्षित करण्याचे प्रयत्न होत असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी रवींद्र गायकवाड यांच्याकडून तिकीट आरक्षित करताना स्पेलिंगमध्ये बदल करण्यात येतो आहे. मागील आठवड्यात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाकडून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तेव्हापासून रवींद्र गायकवाड यांचे तिकीट एअर इंडियाकडून दोनवेळा रद्द करण्यात आले आहे. गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली सर्वप्रथम एअर इंडियाकडून रद्द करण्यात आले, त्यानंतर गायकवाड यांचे हैदराबाद ते दिल्ली हे मंगळवारचे तिकीटही एअर इंडियाकडून रद्द करण्यात आले. गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बुधवारी गायकवाड यांनी नागपूर-मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला.

‘रवींद्र गायकवाड, आर. गायकवाड, प्रो. व्ही. रवींद्र गायकवाड, प्रो. रवींद्र गायकवाड अशी विविध नावे गायकवाड यांच्याकडून तिकीट आरक्षित करताना वापरण्यात आली आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अनेकदा गायकवाड यांनी त्यांच्या आडनावाचे स्पेलिंग बदलूनदेखील तिकीट आरक्षित करण्याचे प्रयत्न केले,’ अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने दिले आहे.

गायकवाड यांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे तिकीट आरक्षित केले होते. बुधवारी सकाळी हे विमान उड्डाण करणार होते. एअर इंडियाच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून गायकवाड यांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र ‘चप्पलमार’ गायकवाड यांची ओळख पटताच एअर इंडियाकडून त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. मात्र एकदा तिकीट रद्द होऊनही गायकवाड यांनी पुन्हा एकदा तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी हैदराबाद ते दिल्ली विमानाचे तिकीट आरक्षित केले. यानंतर पुन्हा एअर इंडियाला ‘चप्पलमार’ गायकवाड यांची ओळख पटली आणि पुन्हा त्यांचे तिकीट रद्द झाले.