Shocking Trafficking and Abused News Uttar Pradesh : अपहरण, अनन्वित छळ आणि विक्रीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका १७ वर्षीय मुलीची चमत्कारिकरित्या सुटका झाली आहे. एका मुलाने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या अपहृत मुलीचा छडा लागला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आग्रा येथील मैनपुरी येथील एका कोचिंग इन्स्ट्यिट्युटमध्ये जात होती. १८ मे २०२४ रोजी तिच्याच ओळखीच्या एका व्यक्तीने तिचं अपहरण करून तिला अंमली पदार्थ पाजले. त्यानंतर पुढील आठ महिन्यात तिला एका शहरातून दुसऱ्या अन् दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात स्थलांतर करण्यात आले. एवढंच नव्हे तर या शहरांमध्ये विविध पुरुषांना तिची विक्री करण्यात आली. परिणामी तिच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्या राहत्या घरापासून जवळपास ६५० किमी अंतरावर येऊन ती पोहोचली. राजस्थानमधील अजमेर येथे विष्णू माळी या पुरुषाने तिला तब्बल साडेतीन लाखाला विकत घेतलं. तो स्वतःकरता वधूच्या शोधात होता. या मुलीच्या रुपाने त्याचा वधूचा शोध संपला त्यामुळे त्याने तिला विकत घेऊन तिच्याशी लग्न केलं.

लग्न झाल्याच्या उत्साहात त्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. या एका कृतीमुळे या मुलीचं नशीब पालटलं अन् काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी अखेर पोलिसांना सापडली. पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत विष्णू माळीला ताब्यात घेतलं. तर, मुलीला मैनपुरी येथे परत आणण्यात आले आहे.

पोलीस विष्णू माळीपर्यंत कसे पोहोचले?

नीरज नावाच्या एका व्यक्तीने मुलीला अजमेर येथील विष्णू माळीला विकले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस विष्णू माळीपर्यंत पोहोचू शकले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्याअंतरग्त गुन्हा दाखल केला आहे.

मुलीने सांगितली आपबिती

दरम्यान, या चौकशीत पीडित मुलीचाही जबाब नोंदवण्यात आला. या जबाबात तिने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ती म्हणाली, शेजारच्या गावातील नीरजने माझं प्रथम अपहरण केलं. मला इटावा येथे आणण्यात आलं. तिथे मला अंमली पदार्थ पाजण्यात आले. तसंच, तिथेच बलात्कारही करण्यात आला. त्याने आग्रा येथील रवी आणि बॉबी नावाच्या व्यक्तींना मला विकलं. तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की नरकात आलेय, मी चुकीच्या व्यक्तींच्या हाती सापडले आहे. नंतर त्या दोघांनी माझी अजमेर येथे तस्करी केली. त्यानंतर विष्णू माळी नावाच्या व्यक्तीशी माझा जबरदस्ती विवाह करण्यात आला.”

माळीच्या कुटुंबाने सांगितलं की, विष्णूसाठी आम्ही वधू शोधत होतो. पण अडचणी येत होत्या. त्यामुळे आम्ही वधू विकत घेतली.”
पीडित मुलीचं अपहरण झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिची प्रचंड शोधाशोध केली. अखेर आठ महिन्यांनी ती तिच्या आईवडिलांकडे परतली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking news kidnapped trafficked abused rajsthan man online marriage photo ends ordeal 17 year old girl sgk