Sonam Raghuvanshi सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी प्रकरण देशभरात गाजतंय. मध्य प्रदेशातील व्यावसायिक राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर हे दोघंही २० मे रोजी मधुचंद्राला गेले होते. २३ मे रोजी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने आणि इतर तिघांच्या मदतीने राजाची हत्या केली. सुरुवातीला हे दाम्पत्य गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान २ जून रोजी राजाचा मृतदेह शिलाँग येथील दरीत सापडला. सोनम मात्र बेपत्ता होती. अखेर ८ जूनच्या रात्री ती पोलिसांना शरण आली आणि तिचा सगळा बनाव समोर आला. पोलिसांनी या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक केली आहे. आता राजाच्या वडिलांनी सोनम तंत्रविद्या करायची आणि तिने काळी जादू केली होती असा आरोप केला आहे.
राजा रघुवंशीच्या वडिलांनी काय आरोप केला आहे?
राजा रघुवंशीचा तेरावा झाल्यानंतर त्याचे वडील अशोक रघुवंशी यांनी त्यांच्या सुनेवर म्हणजेच सोनम रघुवंशीवर गंभीर आरोप केले आहेत. “राजा आणि सोनमचं लग्न झालं. त्यानंतर राजाने सोनमच्या सांगण्यावरुन आमच्या घराबाहेर छोटं गाठोडं वाटेल अशी काहीतरी वस्तू टांगली होती. आम्ही विचारणा केली तेव्हा तो म्हणाला सोनमने सांगितलं आहे हे छोटं गाठोडं बांधलेलं असेल तर कुणाची नजर लागणार नाही. सोनम तंत्रविद्येवर विश्वास ठेवणारी होती. मला वाटतंय की तिने राजावर काळी जादू केली होती. राजाची हत्या झाल्याची बातमी आल्यानंतर आम्ही ते गाठोडं काढून टाकलं आहे. माझ्या मुलाची हत्या ज्या आरोपींनी केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.” अशी मागणी अशोक रघुवंशी यांनी केली आहे.
राजाची आई उमा रघुवंशी काय म्हणाल्या?
राजाची आई उमा रघुवंशी यांनी सांगितलं की, “राजा आणि सोनम हे दोघंही मंगळाची पत्रिका असलेले होते. सोनमच्या कुटुंबाच्या ज्योतिष्यांनी जो मुहूरत सांगितला त्याच मुहूर्तावर आम्ही लग्न लावून दिलं. लग्नानंतर फक्त चार दिवसच सोनम आमच्याकडे होती त्यानंतर प्रथेप्रमाणे माहेरी गेली. मी जर सोनमला भेटले तर तिला विचारणार आहे की माझ्या मुलाला (राजा रघुवंशी) तू का मारलं? ” टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांना सापडलं मर्डर वेपन
मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या राजा रघुवंशीचं आणि सोनमचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. दोघंही २० मे रोजी मधुचंद्राला गेले. सुरुवातीला ते बंगळुरुला गेले, त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर सोनम आणि राजा रघुवंशी शिलाँगला गेले. २३ मे रोजी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाची हत्या केली. सुरुवातीला हे जोडपं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणात हत्येचा संशय पोलिसांना आला होता. कारण राजाचा मृतदेह सापडला तरीही सोनमचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाची चक्रं फिरवली. ज्यानंतर सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला अटक झाली. या घटनेनंतर ८ जूनच्या रात्री सोनमही पोलिसांना शरण आली. आता पोलिसांना राजा रघुवंशीची हत्या ज्या हत्याराने करण्यात आली ते सापडलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.