सुरक्षेच्या दुष्टीकोनातून चीन भारतासमोर सातत्याने नवनवीन आव्हाने निर्माण करत आहे. चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेट तैनात करण्याची शक्यता आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सध्या चिनी लष्कराच्या रॉकेट फोर्सकडून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेटच्या चाचण्या सुरु आहेत असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्सिजनची कमतरता असलेल्या उंच पर्वतीय प्रदेशात हे रॉकेट प्रचंड उपयुक्त असून त्यामुळे लष्करी क्षमतेत मोठया प्रमाणावर वाढ होईल. युद्ध प्रसंगात उंचावरील प्रदेशात पारंपारिक शस्त्रे वाहून नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातुलनेत हे नवीन रॉकेट वेगाने तैनात करता येऊ शकते. मागच्या काही काळात सीमेवर भारत आणि चीनमध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग घडलेले आहेत.

मागच्या वर्षी डोकलामवरुन भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले होते. ७० पेक्षा अधिक दिवस हा संघर्ष चालला. भारताचे आव्हान लक्षात घेता रणनितीक दृष्टीने पारंपारिक शस्त्रांपेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट जास्त उपयुक्त ठरेल असे बिजींग येथील संशोधक हान जनली यांनी सांगितले.

मागच्याच महिन्यात चिनी लष्कराने भारताला लागून असणाऱ्या सीमेवर तिबेटमध्ये वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले. आपल्या लष्कराच्या मदतीसाठी चीनने हे वेदर स्टेशन उभारले असून संघर्ष, तणावाच्या परिस्थितीत चीनच्या लष्कराला या वेदर स्टेशनची मोठी मदत होणार आहे. भारताला लागून असणाऱ्या सीमांवर आणखी असे वेदर स्टेशन्स उभारण्याची चीनची योजना आहे.

तिबेटमधील हुंझे काउंटीमधील युमाई शहरात हे वेदर स्टेशन आहे. या वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या माहितीचा वाहतूक आणि दळणवळणासाठी उपयोग होईल असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला मदत होईल तसेच चीनला सीमेवरील हालचालींचे नियोजनही करता येईल असे तिबेट वेदर ब्युरोच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon china could deploy electromagnetic rocket near indian border