भारतीय वंशाचे ब्रिटिश अब्जाधीश शेरियन देवानी यांची त्यांच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपातून पुरेशा पुराव्याअभावी दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. देवानी यांचा विवाह भारतीय वंशाची स्वीडिश महिला अ‍ॅनी हिंदोच्या हिच्याशी झाला होता. सदर दाम्पत्य २०१० मध्ये मधुचंद्रासाठी दक्षिण आफ्रिकेत आले असताना देवानी यांनी भाडोत्री मारेकऱ्यांमार्फत अ‍ॅनीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पत्नीची हत्या करण्यासाठी भाडोत्री मारेकरी आणल्याच्या आरोपाबाबत देवानी यांनी बचाव करण्यापूर्वीच वेस्टर्न केप न्यायालयाने  हा खटलाच फेटाळला. देवानी यांच्याविरुद्धचा आरोपच दुबळा आहे. देवानी यांना दोषी धरावे असा कोणताही सबळ पुरावा समोर आलेला नाही, असे न्यायमूर्तीनी स्पष्ट केले.