अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने बुधवारी जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ SpaceX Falcon Heavy या रॉकेटचे प्रक्षेपण केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती देण्यात आली. त्यानंतर या मोहिमेच्या यशानंतर अनेकांनी स्पेसएक्सवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथील नासाच्या ऐतिहासिक प्रक्षेपण केंद्रातून ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले. या रॉकेटसोबत एलन मस्कची स्पोर्ट्स कारही अवकाशात पाठवण्यात आली आहे.

एका नव्या दिशेने झेपावलेल्या या रॉकेटचे प्रक्षेपण झाल्यानंतर कंपनीच्या मुख्यालयात त्या क्षणी उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

‘फाल्कन’ ६३.८ टन वजनांचे रॉकेट असून, हे वजन जवळपास दोन अंतराळ यानांच्या बरोबरीचे आहे. २३० फूट लांबीच्या या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावण्यात आले आहेत. हे रॉकेट अवकाशात झेपावल्यानंतर लॉरेन लियॉन्सने सोशल मीडियावर त्याची प्रशंसा केली.
भविष्यात या रॉकेटच्या सहाय्याने मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवता येणार असल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात येत आहे. असे जगातील सर्वाधिक ताकदीचे हे रॉकेट टेस्लातील अब्जाधीश एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने तयार केले आहे.