पीटीआय, नवी दिल्ली
अयोध्येतील राम मंदिराच्या २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळय़ापूर्वी मंदिरासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत. यात १०८ फूट लांब अगरबत्ती, २१०० किलो वजनाची घंटा, ११०० किलो वजनाचा एक विशाल दिवा, सोन्याच्या पादुका, १० फूट उंच कुलूप आणि चावी आणि एकाच वेळी आठ देशांची वेळ दर्शवणारे घडय़ाळ यांचा पाठवण्यात आलेल्या विशेष भेटवस्तूंमध्ये समावेश आहे.
नेपाळमधून ३००० वस्तूंची भेट
नेपाळमधील जनकपूर येथील सीतेच्या जन्मस्थानावरून भगवान रामासाठी तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येत दाखल झाल्या आहेत. चांदीचे बूट, दागिने आणि कपडय़ांसह भेटवस्तू या आठवडय़ात जनकपूर धाम रामजानकी मंदिरातून सुमारे ३० वाहनांमधून अयोध्येपर्यंत आणण्यात आल्या.
अशोक वाटिकेतील खडक
श्रीलंकेच्या शिष्टमंडळानेही अशोक वाटिकेतील एक खडक अयोध्येला भेट दिला आहे. अशोक वाटिकेचा उल्लेख रामायणात आहे.
१०८ फूट लांबीची अगरबत्ती
बडोदा ते अयोध्या या मार्गावरून १०८ फूट लांबीच्या अगरबत्तीचा प्रवास सुरू आहे. ३,६१० किलो वजनाची आणि जवळपास ३.५ फूट रुंद असलेली ही अगरबत्ती बडोद्यात तयार करण्यात आली. त्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला. ‘ही अगरबत्ती पर्यावरणपूरक आहे, ती सुमारे दीड महिना टिकेल आणि तिचा सुगंध अनेक किलोमीटरवर पसरेल,’असे अगरबत्ती तयार करणारे विहा भारवाड यांनी सांगितले.
‘३७६ किलो गुग्गुल (डिंक राळ), ३७६ किलो नारळाची करवंटी, १९० किलो तूप, १४७० किलो शेण, ४२० किलो औषधी वनस्पती वापरण्यात आल्या’, अशी माहिती भारवाड यांनी दिली.
हेही वाचा >>>Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्रभू श्रीरामासाठी बनवलाय ११०० किलोचा दिवा, पाहा व्हायरल फोटो
महाकाय दिवा
बडोद्याचे शेतकरी अरविंदभाई पटेल यांनी ११०० किलो वजनाचा महाकाय दिवा तयार केला आहे. या दिव्यात ८५१ किलो तूप वसू शकेल. हा दिवा ‘पंचधातू’पासून (सोने, चांदी, तांबे, जस्त व लोखंड) पासून तयार केला आहे.
’गुजरातमधील अखिल भारतीय डबगर समाजाने ५६ इंची नगारू पाठवला आहे.
’अलिगडमधील सत्य प्रकाश शर्मा यांनी १० फूट उंच, ४.६ फूट रुंद आणि ९.५ इंच जाडीचे ४०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे.
’उत्तर प्रदेशातील एटाहमध्ये ‘अष्टधातूं’ची २१०० किलो वजनाची घंटा तयार करण्यात आली आहे.
’लखनौ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी एकाच वेळी आठ देशांची वेळ दर्शवणारे घडय़ाळ दिले.
’मथुरेतील श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान २०० किलो लाडू पाठवत आहे.
’श्रीराम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली खास साडी सुरतमध्ये तयार करण्यात आली आहे.
’सुरतमधील हिरे व्यापाऱ्याने ५ हजार अमेरिकन डायमंड्स हिरे व २ किलो चांदी वापरून राम मंदिराच्या संकल्पनेवर हार तयार केला आहे.
अभिषेक सोहळ्यापूर्वी देश-विदेशातून वेगवेगळ्या भेटवस्तू पाठवल्या जात आहेत. त्यामध्ये अगरबत्ती, घंटा, दिवा, पादुका अशा विविध वस्तूंबरोबरच प्रसादासाठी तऱ्हेतऱ्हेच्या मिठायांचाही समावेश आहे.
(एटाहामधील भाविकांनी २४०० किलो वजनाची महाकाय घंटा पाठवली आहे.)