ISC Topper Srijani Removes Surname : कोलकात्यातली द फ्यूचर फाऊंडेशन शाळेत इयत्ता बारावीत अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या अवघ्या १७ वर्षीय मुलीने तिचं आडनाव सोडलं आहे. मी फक्त मानता या धर्मावर विश्वास ठेवते, असं म्हणत तिने यापुढे फक्त तिचं नावच लावण्याचा निश्चय केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

CISCE बोर्डाच्या ISC परीक्षेत (इयत्ता बारावी) श्रीजानी अव्वल ठरली. तिच्या यशामुळे ती राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली असतानाच आता तिच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अशा सर्व प्रकारच्या असमानतेविरुद्धच्या तिच्या तत्वनिष्ठ भूमिकेमुळेही चर्चेत आली आहे.

बारावीच्या परीक्षेआधी तिने तिच्या आडनावाशिवाय फक्त तिच्या नावाने नोंदणी करण्याची परवानगी मिळावी याकरता औपचारिक विनंती केली होती. ही विनंती बोर्डाने आता मान्य केली आहे. द फ्यूचर फाऊंडेशन स्कूलच्या प्राचार्य रंजन मिटर यांनी या भूमिकेचं समर्थन केलंय. ते म्हणाले, “जर कायद्याने परवानगी दिली तर आम्हाला कोणताही आक्षेप नसेल. आडनाव लावण्याची कायदेशीर आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि जर हे कुटुबांच्या इच्छेनुसार होणार असेल तर आम्ही पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहोत.”

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रीजानी म्हणाली, “मी प्रत्येक अन्यायाविरोधात आहे. सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक असमानता मला मान्य नाही. सांप्रदायिक हिंसाचार आणि धार्मिक अतिरेकी कारवाया केवळ फूट पाडण्याचं काम करतात. विविध परंपरा असलेले राष्ट्र केवळ परस्पर समंजसपणा, सामायिक मूल्ये आणि सर्वांना समान संधी देऊनच भरभराटीला येऊ शकते.” श्रीजानी विविध सामाजिक चळवळींमध्येही सहभागी असते. कोलकाता येथे प्रशिक्षाणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात पुकारलेल्या ‘रिक्लेम दि नाईट’ या मोठ्या निषेधार्थ रॅलीतही ती सहभागी झाली होती.

सामाजिक बंधनांच्या ओझ्याखाली मुलं वाढू नयेत

श्रीजानीच्या मुल्यांवर तिच्या पालकांचा प्रचंड प्रभाव आहे. तिची आई गोपा मुखर्जी या गुरुदास कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका आहेत. तर वडील देबाशिष गोस्वामी हे भारतीय सांख्यिकी संस्थेत गणितज्ज्ञ आहेत. आई गोपा मुखर्जी म्हणाल्या, “लग्नानंतर मी माझं आडनाव बदललं नाही. आमची मुले आमचं कोणतंही आडनाव निवडण्यास स्वतंत्र होते. परंतु, मी आणि माझे पती पितृसत्ताक नियम आणि जातिव्यवस्थेला मूलभूतपणे विरोध करतो. आम्हाला आमची मुले सामाजिक बंधनांच्या ओझ्याखाली न वाढता वाढावीत आणि माणुसकीला त्यांनी महत्त्व द्यावं अशी आमची इच्छा आहे.”

पासपोर्टवरही आडनावाची गरज नाही

त्या पुढे म्हणाल्या, “मुलांच्या जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला तेव्हा त्यांनी आडनाव समाविष्ट केलं नव्हतं. या निर्णयासाठी आम्हाला क्वचितच विरोधाचा सामना करावा लागला. आडनाव वापरण्याची कायदेशीर सक्ती नाही. अगदी पासपोर्टवरही नाही. पण लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मी अजूनही माझं आडनाव वापरते, पण मी माझा धर्म नेहमीच मानवता म्हणूनच सांगते.”

श्रीजानीला बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये भौतिकशास्त्र किंवा गणिताचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ती तयारी करत आहे.