stand-up comedian Anubhav Singh Bassi shows cancelled : रणवीर अलाहाबादिया याने यूट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये केलेले वक्तव्य गेल्या काही दिवासंपासून चर्चेत आहे. या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले असून प्रशासकीय यंत्रणांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र रणवीरच्या या कार्यक्रमातील वक्तव्याची झळ इतर कॉमेडियन्सना देखील बसताना पाहायला मिळत आहे. कारण स्टँड अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी याचा लखनऊ मधील शो रद्द करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांनी त्याच्या शोला परवानगी नाकारली आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष अपर्णा यादव यांनी डीजीपी प्रशांत कुमार यांना बस्सीच्या शोबद्दल पत्र लिहीले होते. ज्यामध्ये त्यांनी या शोमधून महिलांचा अपमान होणार नाही याची खात्री करावी किंवा शो रद्द करण्याचा विचार करावा अशी विनंती केली होती. यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत बस्सीच्या शोला परवानगी मिळू शकली नाही.

“आम्हाला यापूर्वीच्या कार्यक्रमात अक्षेपार्ह भाषा आढळून आली आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार राखणे ही आमची जबाबदारी आहे,” असे अपर्णा यादव यांनी पोलिसांना लिहिलेल्या त्यांच्या १४ तारखेच्या पत्रात म्हटले होते. आक्षेपार्ह कंटेन्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण देत बस्सीच्या शोला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचे प्रमुख कारण हे संभाव्य आक्षेपार्ह कंटेंटच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची चिंता हे असल्याचे एसीपी राधा रमन सिंग यांनी सांगितले. “शहरातील काही संघटना किंवा लोकांच्या मोठ्या जमावाकडून त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाऊ शकते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्थानिक गुप्तचर विभागानेही त्याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली नाही,” असेही एसीपी सिंग म्हणाले. तसेच त्यांनी पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे, हे देखील एक कारण असल्याचे सांगितले.

राजू श्रीवास्तव, कपिल शर्माचे दिले उदाहरण

राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष अपर्णा यादव यांनी यावेशी दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि कपिल शर्मा सारख्या ज्येष्ठ विनोदी कलाकारांचे कौतुक केले. “लोकांना हसवण्यासाठी अश्लील भाषा वापरण्याची गरज नाही,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मेरठ येथील ३२ वर्षीय कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हा लखनऊच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर आहे. त्यांने २०१७ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. देशात आणि जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे ३७ लाखांहून अधिक यूट्यूब सबस्क्राइबर आणि १.८ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand up comedian anubhav singh bassi shows canceled by lucknow police over law order concerns ranveer allahbadia rak