भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हजवरील बलिदान चिन्हावरुन सुरु असलेल्या वादामध्ये आता राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. सुब्रमण्यम स्वामी वादग्रस्त विधाने करण्यासाठी ओळखले जातात. पण यावेळी त्यांनी धोनीला वाद संपवण्याचा सल्ला दिला आहे.

माझा न मागता धोनीला एका सल्ला आहे. कितीही त्रासदायक असलं तरी आयसीसीचे नियम मान्य केल्याने तुझं काहीही नुकसान होणार नाही. तुझ्या प्रेरणादायी क्रिकेट करीयरशी संबंध नसलेला हा वाद संपवून टाक. हा वाद वाढावा हीच भारतविरोधी शक्तींची इच्छा आहे. त्यात त्यांचा आनंद आहे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बीसीसीआयने या प्रकरणी धोनीच्या पाठीमागे उभं राहत धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी मागितली होती. मात्र ICC ने BCCI ची ही मागणी फेटाळली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता बीसीसीआय या वादातून माघार घेण्याची शक्यता आहे. या मुद्दावर आयसीसीला आव्हान देण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. बीसीसीआयला हा वाद वाढवण्याची इच्छा नाही. बीसीसीआय आयसीसीच्या नियमांचे पालन करण्याची भूमिका घेऊ शकते.