रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर तोंडसुख घेतल्यावर भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांचीही त्या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून बुधवारी सकाळी त्यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्या अनेक निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये बौद्धिक स्वामित्व हक्कावरून स्वामींनी सुब्रमण्यम यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर वस्तू व सेवा विधेयकामध्ये काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यम यांचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात. सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात. त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे स्वामी यांनी म्हटले आहे. या व्यक्तींना सरकारने फारसा विचार न करता संबंधित पदांवर बसवले होते, असे सांगत त्यांनी मोदी यांच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या व्यक्ती भाजपच्या निष्ठावान आहेत. त्यांना वरिष्ठ पदांवर संधी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचीही त्या पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर या विषयावर सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. खुद्द रघुराम राजन यांनी आपण मुदतवाढ स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचे सांगत सप्टेंबरमध्ये कार्यकाळ संपल्यावर गव्हर्नर पदावरून दूर होणार असल्याचे संकेत दिले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2016 रोजी प्रकाशित
अरविंद सुब्रमण्यम यांची हकालपट्टी करा, सुब्रमण्यम स्वामींची नवी मागणी
अरविंद सुब्रमण्यम हे सध्या नरेंद्र मोदी यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-06-2016 at 11:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subramanian swamy demands to sack arvind subramanian