न्यायालयाचा आदेश न पाळल्याबद्दल ‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे यापुढे आपण पालन करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आम्ही आमची संपत्ती विकू, पण न्यायालयाने आपल्याला कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी रॉय यांनी न्यायालयाकडे केली. मात्र, सहाराचे संचालक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात कोणतेही ठोस प्रस्ताव घेऊन आलेले नाहीत. त्यांच्याकडे बॅंक गॅरंटीही नाही. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर न्यायालय समाधानी नाही, असे सांगत सुब्रतो रॉय यांच्यासह कंपनीच्या अन्य दोन संचालकांना दिल्लीतच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. केवळ महिला संचालक वंदना भार्गव यांना ताब्यात न घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पोलीस बंदोबस्तात रॉय यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याआधी रॉय यांना सकाळी न्यायालयाच्या आवारात आणल्यावर मनोज शर्मा नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून, जर मी काही चूक केली असेल, तर मला शिक्षा करा, असे रॉय यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल न्यायाधीशांनी रॉय यांना फटकारले. जर तुम्ही न्यायालयाच्या आदेशांचे वेळीच गंभीरपणे पालन केले असते, तर आज ही वेळ आली नसती, असाही समज न्यायालयाने रॉय यांना दिला.
रॉय यांच्यावर शाईफेक
सुब्रतो रॉय यांच्यावर मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीने शाई फेकली. अचानक घडलेल्या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तातडीने रॉय यांच्याभोवती सुरक्षाकडे तयार करीत त्यांना घटनास्थळापासून लांब नेले. मात्र, काही अज्ञात लोकांनी शाई फेकणाऱया व्यक्तीला जोरदार मारहाण करीत त्याचे कपडेही फाडले.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी रॉय यांनी लखनौमध्ये पोलीसांपुढे शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तातच रॉय यांना सोमवारी संध्याकाळी लखनौहून गाडीने दिल्लीला आणण्यात आले. मंगळवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन जात असतानाच मनोज शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. शाई फेकणारा तरुण वकील असल्याचे पत्रकारांना सांगत होता.